सिंधुदुर्गातील सर्व नऊ उमेदवार विजयी; संतोष राणे, सुधाकर शेट्टी यांच्यासह गव्हर्निंग कौन्सिलच्या सातही जागांवर एकता पॅनेलची बाजी
मुंबई / सिंधुदुर्ग : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरच्या द्विवार्षिक निवडणुकीची मतमोजणी १५ जून रोजी चेंबरच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात पार पडली. संपूर्ण महाराष्ट्रात ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली होती. यामध्ये नाशिक आणि सिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत प्रत्यक्ष निवडणूक झाली.
सिंधुदुर्गातील उद्योग व व्यापारी क्षेत्राचे या निवडणुकीच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते. चेंबरचे बिनविरोध निवडून आलेले अध्यक्ष रविंद्र माणगावे तसेच चेंबरचे माजी अध्यक्ष व कोकणचे सुपुत्र डॉ. श्रीकृष्ण परब यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एकता पॅनेल’ने एकूण नऊ जागांसाठी निवडणूक लढवली होती. प्रचाराच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर असलेल्या एकता पॅनेलच्या विजयावर अखेर मतदारांनी शिक्कामोर्तब केले.
या निवडणुकीत सिंधुदुर्ग व्यापारी महासंघ तसेच कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशन यांनी एकता पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला होता.
कोकण विभागीय अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे संतोष राणे यांनी १८६ मते मिळवत विजय संपादन केला. तर मुंबई व कोकण विभागातून वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे सुधाकर शेट्टी यांनी तब्बल ८५४ मते मिळवत आपला विजय अधोरेखित केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गव्हर्निंग कौन्सिलच्या सात जागांसाठी एकता पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी झाले. त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे :
राजन नाईक – १७३ मते
अॅड. नकुल पार्सेकर – १६४ मते
मनोज वालावलकर – १५८ मते
विजय केनवडेकर – १४६ मते
मिलिंद प्रभू – १४२ मते
विशाल कामत – १४१ मते
कुणाल वरसकर – १३९ मते
तर विरोधी प्रगती पॅनेलकडून उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणारे भालचंद्र राऊत यांना ६६ मते मिळाली.
याशिवाय इतर उमेदवारांमध्ये अन्वेषा आचरेकर यांना ७७, गंगाराम पै यांना ८४, अशोक सारंग यांना ८४, भालचंद्र सामंत यांना ८१, राजेंद्र गावकर यांना ६०, रामचंद्र घोगळे यांना ५० तर उत्तम सराफदार यांना ३७ मते मिळाली.
या दणदणीत विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे चेंबरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे, चेंबरच्या ट्रस्ट बोर्डचे अध्यक्ष आशिष पेडणेकर, माजी उपाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण परब, कुडाळ एम.आय.डी.सी. इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष मोहन होडावडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय सावंत, सचिव राजू जठार, सामाजिक कार्यकर्ते रणजित देसाई तसेच जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
एकता पॅनेलच्या सर्व विजयी उमेदवारांना सुज्ञ मतदारांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल एकता पॅनेलच्या वतीने सर्व मतदारांचे आभार मानण्यात आले.
