मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कटीबद्ध; पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन
कणकवली / करंजे : प्रधानमंत्री जन मन योजना अंतर्गत करंजे येथे आदिवासी बांधवांसाठी बांधण्यात आलेल्या घरकुलांचा गृहप्रवेश सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना राज्यातील प्रत्येक घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
प्रधानमंत्री जन मन आवास योजना अंतर्गत ग्रामपंचायत करंजे गावामध्ये चार घरकुलांना मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी सर्व चारही घरकुले पूर्ण झाली असून लाभार्थ्यांचा गृहप्रवेश सोहळा पार पडला. सदर योजनेतील लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत गावातील श्रीमती वैजयंती मौर्य, शिवाजी वाळके, विठ्ठल वाळके, श्रीमती निर्मला परब व श्रीमती मयुरी शिरसाठ यांनी घरकुल बांधकामासाठी एकूण ४ आर क्षेत्र बक्षीसपत्राद्वारे उपलब्ध करून दिले.
लाभार्थ्यांना जमीन खरेदीसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय (PDU) योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी ३१ हजार ३०५ रुपये प्रमाणे चार लाभार्थ्यांना एकूण १ लाख २५ हजार २२० रुपयांचे अनुदान शासनाकडून देण्यात आले. तसेच प्रधानमंत्री जन मन योजनेअंतर्गत प्रत्येक घरकुलाच्या बांधकामासाठी २ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
याशिवाय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) अंतर्गत मजुरीपोटी एकूण १ लाख ४ हजार ५२० रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. घरकुलांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सोलर पंपाद्वारे पाणीपुरवठा तसेच वीज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते गृहप्रवेश सोहळ्यात लाभार्थ्यांना घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, सभापती हर्षदा वाळके, गटविकास अधिकारी अरुण चव्हाण, उपसभापती राजेश सावंत, जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, विस्तार अधिकारी सूर्यकांत वारंग, सरपंच श्रीमती मेस्त्री, ग्रामसेवक ऋतुराज कदम यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
