You are currently viewing शब्द, संवेदना, पर्यावरण आणि कर्तृत्वाचा दीपस्तंभ
Oplus_16908288

शब्द, संवेदना, पर्यावरण आणि कर्तृत्वाचा दीपस्तंभ

*श्री. रामदास गवराम पुजारी : एका प्रेरणादायी जीवनप्रवासाची गौरवगाथा*

 

जीवनाला कर्माचे अर्घ्य अर्पावे

माणसाने जीवनाचं ध्येय साधावे…

 

या उक्तीला अनुसरून काही व्यक्तिमत्त्वे ही केवळ स्वतःच्या यशामुळे मोठी होत नाहीत, तर आपल्या कार्यातून, विचारांतून आणि समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतून अनेकांच्या जीवनाला दिशा देतात. अशा व्यक्तिमत्त्वांचा जीवनप्रवास हा एका प्रेरणादायी ग्रंथासारखा असतो. श्री. रामदास गवराम पुजारी यांचे व्यक्तिमत्त्व हे अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. शिक्षण, प्रशासन, पर्यावरण संवर्धन, अध्यापन, साहित्यनिर्मिती आणि समाजप्रबोधन या विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा लाभलेल्या भूमीत एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. ग्रामीण वातावरण, मर्यादित साधनसामग्री आणि आर्थिक अडचणी यांवर मात करत त्यांनी आपल्या बुद्धिमत्ता, चिकाटी आणि परिश्रमांच्या बळावर यशाचे नवे शिखर गाठले. त्यांच्या जीवनाची सुरुवात संघर्षातून झाली; परंतु त्याच संघर्षाने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला धैर्य, संवेदनशीलता आणि जिद्दीची धार दिली.

पारनेर तालुक्यातील पुजारमळा येथील प्राथमिक शाळेत त्यांचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. शाळेत सर्वप्रथम आपणच गेलं पाहिजे, पहिल्या फरशीवर आपणच बसलं पाहिजे, शाळेची घंटा आपणच वाजवली पाहिजे, या विचारातून या शाळेने त्यांना आयुष्यभर पहिलं यायला शिकवलं. एक अक्षरही न शिकलेल्या परंतु आपल्या चारही मुलांना शिक्षण द्यायचंच यासाठी आग्रही असणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टांची सदैव असलेली जाण त्यांच्या यशामागे होती. या शाळेनेच सर्वत्र मला सर्वप्रथम यायला शिकवलं, असे ते अभिमानाने सांगतात. प्रत्येक वर्गात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होत असत. येथील एकशिक्षकी शाळेतील स्व.कुंडलिक गणपत जाधव यांनी त्यांच्यावर खूप कष्ट घेतले. त्यांचे सुंदर हस्ताक्षरही त्यांच्याच मार्गदर्शनामुळे घडले. चौथी ते सातवीचे शिक्षण जीवन शिक्षण विद्यामंदिर, पारनेर येथे झाले. त्यावेळी थव्याथव्याने मुलं शाळेला तीन-चार किलोमीटर पायी जायची व यायची. पुढच्या वर्गातील मुलं इंग्रजी विषय फार अवघड असल्याची चर्चा करायची. तेव्हा ते मनात म्हणायचे, “बघूया, इंग्लिश किती अवघड आहे ते!” पुढे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिकत असताना कितीही अवघड स्पेलिंग असलं तरी ते कधीही चुकायचे नाही . चौथी ते सातवी या काळात स्व. संभाजी बोरुडे गुरुजींसारखे उत्कृष्ट इंग्रजी शिक्षक त्यांना लाभले. काहीही चुकलं नसताना मला शंभरपैकी शंभर गुण का पडत नाहीत, असा प्रश्न ते गुरुजींना विचारत. त्यावर गुरुजी हसत म्हणत, “१०० पैकी १०० देता येत नाही म्हणून तुला ९९ गुण द्यावे लागतात .” शाळेतून घरी आल्यानंतर ओट्यावर बसून अगदी काहीही दिसायचं नाही तोवर ते अभ्यास करत. म्हणूनच इंग्रजीवरील प्रभुत्व आणि सुंदर इंग्रजी हस्ताक्षर त्यांना लाभले. सन १९७९ च्या दहावीच्या परीक्षेत त्यांनी ८०.६ टक्के गुण मिळवून पारनेर केंद्रात प्रथम क्रमांक, तालुक्यात द्वितीय क्रमांक आणि जिल्ह्यात ३५ वा क्रमांक प्राप्त केला. इंग्रजी विषयात अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेमध्ये ८७ गुणांसह ते सर्वप्रथम आले. शाळेत असताना भाषणासाठी, प्रतिज्ञा म्हणण्यासाठी तसेच कवायतीच्या वेळी ड्रम वाजवण्यासाठी ते नेहमी पुढे असत . विद्यार्थीदशेपासूनच त्यांच्या असामान्य गुणवत्तेची झलक दिसून येत होती.

शनिवार-रविवार तीन-चार किलोमीटर अंतरावर गुरे चारण्यासाठी रानात जाताना निसर्गाशी झालेला संवाद त्यांच्या मनात खोलवर रुजत गेला. आजही तोच निसर्ग त्यांच्या लेखणीला प्रेरणा देतो. म्हणूनच त्यांच्या लेखनाचा ओघ आई-वडील, निसर्ग, मानवी मूल्ये आणि पर्यावरण या विषयांकडे अधिक दिसून येतो.

अकरावी-बारावीचे शिक्षण पद्मश्री विखे पाटील कॉलेज, प्रवरानगर येथे झाले. दहावीतील उज्ज्वल यशामुळे मिळणाऱ्या, राष्ट्रीय गुणवत्ता शिष्यवृत्तीमुळे त्यांच्या राहण्याचा खर्च भागत असे. कॉलेज सुटल्यानंतर ज्यांना इंग्रजी माध्यमाची अडचण असायची , अशा विद्यार्थ्यांना ते दोन-दोन तास सर्व विषय समजावून सांगत. शिकवण्याची ही आवड पुढे त्यांच्या यशस्वी अध्यापन कारकिर्दीचा पाया ठरली.

न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगर येथे बी.एस्सी. (गणित) करत असतानाच त्यांनी अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि भौतिकशास्त्राचे शिकवणी वर्ग घेतले. त्या माध्यमातून त्यांनी अर्थार्जनही केले. याच काळात त्यांना नांदेड व लखनौ विद्यापीठांचे माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्रा. रंगराव भामरे आणि इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर लाभलेल्या शिक्षकांनी त्यांना घडविण्यात मोलाची भूमिका बजावली.

मराठी,हिंदी,इंग्रजी व गणित या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे . बी.एस्सी. (गणित) पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयांत एम.ए. पदव्या मिळवून आपल्या ज्ञानकक्षा अधिक व्यापक केल्या. विज्ञान आणि साहित्य या दोन भिन्न क्षेत्रांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसून येतो. गणिताने त्यांना विचारांची तर्कशुद्धता दिली, तर साहित्याने संवेदनशीलता आणि अभिव्यक्तीची ताकद दिली.

ॲसिडिटीचा त्रास होत असल्यामुळे, त्यांनी नगरहून पुण्याला जाण्याचा निर्णय घेतला. पुण्यात कुठे उतरायचे हेही त्यांना माहीत नव्हते. बाणेर येथील एका विनाअनुदानित शाळेत गणित विषय शिकवून त्यांनी आपल्या लहान भावाला आणि बहिणीला विद्यार्थी साहाय्यक समितीच्या मदतीने शिक्षण दिले. आज त्यांचा भाऊ पुण्यात उत्तम केटरर्स म्हणून कार्यरत आहे, तर बहीण गावाकडे शिक्षिका आहे. त्यानंतर त्यांनी व्यंकटेश्वरा हॅचरीज, पुणे येथे टेक्निशियन म्हणून दोन वर्षे काम केले. पुढे नोकरी सोडून खाजगी शिकवण्या घेतल्या आणि अकरावी-बारावी गणित तसेच स्पर्धा परीक्षांसाठीचा Mental Ability व Maths हा विषय पुण्यातील अनेक नामांकित वर्गांमध्ये शिकवला. १९९१ ते १९९३ या कालावधीत त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात विशेष कार्य केले. ज्ञानदान हीच खरी समाजसेवा असल्याचा त्यांचा दृढ विश्वास होता आणि आजही आहे. अध्यापन हे त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाज घडविण्याचे प्रभावी साधन म्हणून स्वीकारले. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता करता ते वनक्षेत्रपाल पदाच्या परीक्षेत यशस्वी झाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवून त्यांची १९८९ मध्ये वनक्षेत्रपाल पदासाठी निवड झाली. १९९३ ते १९९५ या कालावधीत प्रशिक्षण पूर्ण करून त्यांनी वन विभागात प्रवेश केला.

पुढील सुमारे सत्तावीस वर्षे त्यांनी वनसेवेत अत्यंत प्रामाणिकपणे आणि कर्तव्यदक्षतेने काम केले. जंगल, वन्यजीव, जैवविविधता आणि पर्यावरण यांच्याबद्दल त्यांना विशेष आस्था होती. विविध पदांवर कार्यरत असताना त्यांनी वृक्षसंवर्धन, वनसंपत्तीचे रक्षण आणि पर्यावरण संरक्षण यासाठी उल्लेखनीय योगदान दिले. त्यांची बहुतांश सेवा पुण्यातच झाली. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या पर्यावरणविषयक घोषवाक्यांना विशेष लोकप्रियता लाभली. पुणे महानगरपालिकेने ही घोषवाक्ये शहरातील विविध चौकांमध्ये जनजागृतीसाठी प्रदर्शित केली असून दरवर्षीच्या फुले-फळे प्रदर्शनातही त्यांचे प्रदर्शन केले जाते. मे २०२२ मध्ये सहायक वनसंरक्षक पदावरून ते सेवानिवृत्त झाले. परंतु त्यांचा कार्यप्रवास तिथेच थांबला नाही. मे २०२२ नंतर महाराष्ट्र शासनाच्या कुंडल वन प्रबोधिनी येथे त्यांना तीन वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. जानेवारी २०२३ ते जानेवारी २०२६ या कालावधीत सत्रसंचालक म्हणून कार्य करताना त्यांनी वनक्षेत्रपाल प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. भारत भ्रमणाची संधी लाभल्यामुळे देशातील विविध जंगलांचा अभ्यास करण्याची संधी त्यांना मिळाली.

 

हिरवळ पसरलेली अवतीभोवती

गर्दी मनात दाटलेली भावनांची

उद्याच्या श्वासासाठी अलगद

रिती करतोय ओंजळ शब्दांची…

 

पर्यावरण संवर्धन हे त्यांच्या जीवनाचे एक महत्त्वाचे ध्येय राहिले आहे. पर्यावरणविषयक जनजागृती, वृक्षलागवड आणि नागरिकांमध्ये पर्यावरणप्रेम जागविण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले.

साहित्य हे त्यांच्या जीवनातील दुसरे महत्त्वाचे क्षेत्र. विविध वृत्तपत्रे, मासिके आणि दिवाळी अंकांमधून त्यांचे लेख, कविता, प्रवासवर्णने आणि पुस्तक परीक्षणे प्रकाशित होत राहिली आहेत. त्यांच्या लेखनात जीवनानुभवांची समृद्धी, निसर्गाशी असलेले नाते, मानवी नातेसंबंधांची ऊब, सामाजिक जाणीव आणि मूल्यनिष्ठ विचारांचे दर्शन घडते .आकाशवाणीवरील कार्यक्रम, “कविता जगणारी माणसं” चॅनल, पारनेर साहित्य साधना परिवार तसेच विविध साहित्यिक व्यासपीठांवर त्यांनी केलेले काव्यवाचन रसिकांच्या विशेष पसंतीस उतरले आहे.

त्यांची आजवरची प्रकाशित साहित्यसंपदा पुढीलप्रमाणे आहे :

• आई माझं जग • उद्याच्या श्वासासाठी • खोल मनाच्या तळाशी • पर्यावरणविषयक घोषवाक्ये पुस्तिका • देवमाणूस • आनंदयात्री ( घडी पत्रिका )

 

‘उद्याच्या श्वासासाठी’ या पर्यावरणकेंद्री कवितासंग्रहातून त्यांनी लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षलागवडीचा व निसर्गसंवर्धनाचा प्रभावी संदेश दिला आहे , तर ‘खोल मनाच्या तळाशी’ या संग्रहातून मानवी मनाच्या सूक्ष्म भावविश्वाचा वेध घेतला आहे .

त्यांच्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणविषयक कार्याची दखल विविध संस्थांनी घेतली आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार २०२१, राष्ट्रीय प्रबोधनयात्री पुरस्कार (फेब्रुवारी २०२३), न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, अहमदनगरच्या गणित विभाग व गणित विभाग माजी विद्यार्थी संघाकडून Alumni Achievement Award २०२२-२३ (डिसेंबर २०२२), सेवानिवृत्त वन कर्मचारी संघ, महाराष्ट्र-धुळे शाखेकडून “जीवनसाथी” या कवितेची सर्वोत्कृष्ट कविता म्हणून निवड होऊन पारितोषिक (जुलै २०२३), वर्ल्ड व्हिजन संस्था, मुंबईद्वारा “प्रजासत्ताक अमृतगौरव पुरस्कार २०२३” (२७ फेब्रुवारी २०२४), “उद्याच्या श्वासासाठी” या कवितासंग्रहास जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ, नागपूर यांचा “बाबुराव बागुल राज्यस्तरीय पुरस्कार” (मार्च २०२४), “खोल मनाच्या तळाशी” या कवितासंग्रहास “रा. ग. जाधव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार” (मार्च २०२५) असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

मार्च २०२६ मध्ये हनोई, व्हिएतनाम येथे आयोजित सहाव्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात, आजवरच्या साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक योगदानासाठी त्यांना “डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय साहित्य पुरस्कार” प्रदान करण्यात आला. तसेच एप्रिल २०२६ मध्ये संघर्षनायक मीडिया व पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आलेल्या “आत्मसन्मान गौरव पुरस्कार २०२६” ने त्यांना सन्मानित करण्यात आले.श्री. रामदास गवराम पुजारी यांचे संपूर्ण जीवन पाहिले असता एक गोष्ट स्पष्ट जाणवते—त्यांनी कोणत्याही क्षेत्रात प्रसिद्धीचा हव्यास न बाळगता निष्ठेने कार्य केले. शिक्षणात गुणवत्ता, सेवेत प्रामाणिकपणा, पर्यावरणात बांधिलकी, साहित्यात संवेदनशीलता आणि समाजकार्यात आत्मीयता ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. आजच्या भौतिकतावादी युगात मूल्यांची जपणूक करणारी, पर्यावरणासाठी झटणारी, साहित्याला जीवनमूल्यांचे माध्यम मानणारी आणि समाजाला सकारात्मक दिशा देणारी व्यक्तिमत्त्वे फारच कमी दिसतात.

श्री. रामदास गवराम पुजारी हे अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. आजवरच्या जीवन प्रवासात अनेक सहृदयी माणसं भेटली, पाठीवर कौतुकाची थाप देत राहिली, पुढे पुढे जायला प्रेरणा देत राहिली. ही सारी माणसं त्यांनी आपल्या हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवली आहेत. आयुष्यात सदैव विनम्रता,विनयशीलता व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती हिच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली असावी. त्यांच्या या वाटचालीत पत्नी निलम,मुली सुप्रभा व नुपूर यांची तोलामोलाची साथ लाभली आहे .

त्यांचे जीवन हे संघर्षातून उभ्या राहिलेल्या यशाची, ज्ञानातून घडलेल्या व्यक्तिमत्त्वाची आणि संवेदनशीलतेतून फुललेल्या साहित्यसाधनेची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या लेखणीतून निर्माण होणारे शब्द, त्यांच्या कार्यातून उमटणारे संस्कार आणि त्यांच्या जीवनातून मिळणारी प्रेरणा आगामी पिढ्यांना दीर्घकाळ मार्गदर्शक ठरत राहील, यात कोणतीही शंका नाही. समाज, साहित्य आणि पर्यावरण क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान हे सदैव प्रेरणादायी राहील आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व अनेकांसाठी प्रेरणेचा दीपस्तंभ ठरेल. वर्ल्ड व्हिजन टाइम्स मुंबई तर्फे त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !!

 

 

प्रा. नागेश सोपान हुलवळे

संपादक, वर्ल्ड व्हिजन टाइम्स, मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा