You are currently viewing सिंधुदुर्ग सुधारतोय की बिघडतोय…??

सिंधुदुर्ग सुधारतोय की बिघडतोय…??

विशेष संपादकीय……

*…सिंधुदुर्ग सुधारतोय की बिघडतोय…??*

नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला पूर्वीचा रत्नागिरी आणि विभाजन झाल्यावर नवी नवरी सजावी तसा सजलेला सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे महाराष्ट्राच्या शिरपेचातील मुकुटमणी..! पोटापुरती असलेली भातशेती आणि चार पैसे गाठीला येतील एवढी असलेली आंबा, काजू, माड, पोफळीची बागायती नि वाल, मिरची, तांबडा माठ, मुळा, मोहरीची हिरवी भाजी यांसह दोनवेळ यथेच्छ जेवणारी कोकणी माणसं सणासुदीला चाकरमान्यांच्या मनीऑर्डरची वाट पहायची. पण, कोकणातील गुणवत्ताधारण मुलांच्या हाताला काम नव्हते, कोकणात रोजगार नाही अशी समज करून शिकलेली मुले मुंबई पुण्याकडे पळू लागली तेव्हा कोकणच्या विकासाचा ध्यास घेतलेले माजी केंद्रीय मंत्री कै.मधु दंडवते उर्फ नानांनी सिंधुदुर्गातील खनिजपट्टा म्हणून ज्ञात असलेल्या रेडी गावात १९९० च्या दशकात उषा इस्पात (Usha Ispat) कंपनी १९९० च्या दशकात विशेष प्रयत्नांनी आणली होती. जॉर्ज फर्नांडिस रेल्वेमंत्री असताना कोकण रेल्वे केवळ कल्पनेत येणार म्हणता म्हणता नानांनी प्रत्यक्षात आणली. या सर्व विकासात्मक प्रकल्पांना कोकणात आणण्याचा त्यांचा शुद्ध हेतू होता तो केवळ कोकणातील सुशिक्षित मुलांच्या हातांना कोकणातच रोजगार उपलब्ध करून द्यावा, आणि कोकणात छोट्या मोठ्या उद्योगातून, शेतीतून उत्पादित मालाला कोकण रेल्वेच्या माध्यमातून मोठ मोठ्या शहरांकडे विक्रीसाठी नेण्याचे उत्तम साधन सुद्धा उपलब्ध व्हावे.
…परंतु नानांचे हे स्वप्न अधुरे राहिले. समाजवादी विचारसरणीचा हा सिंधुदुर्ग जिल्हा जिथे आजही बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधू दंडवते यांचे नाव आवर्जून घेतलं जातं.., कोकण रेल्वे म्हणजे दंडवते, रेडीतील उषा इस्पात कंपनी म्हणजे दंडवते असे म्हटले जाते तिथे नानांनी आणलेला उषा इस्पात प्रकल्प, पिग आयर्न म्हणजेच कच्च्या मालाची कमी, कर्जाचा बोजा आणि एकात्मिक स्टील प्लांट उभारणीत आलेले अपयश यामुळे बंद पडला. जिल्ह्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना मिळालेला रोजगार गेला. कितीतरी युवक बेरोजगार झाले. ज्यांच्या जमिनी प्रकल्पासाठी गेल्या त्यांच्याही आशा मावळल्या
जिल्ह्यात कोकण रेल्वे आली, नव्या आशा पल्लवीत झाल्या. प्रकल्पासाठी जमिनी गेल्या त्या कुटुंबातील एकाला नोकरी मिळाली. काही तांत्रिकदृष्ट्या योग्य होते अशा जिल्ह्यातील सुपुत्रांना कोकण रेल्वेने रोजगारासाठी सामावून घेतले. कोकण रेल्वेत स्थानिकांना रोजगार मिळाले…पण.., समाजवादी विचारसरणीचा पराभव झाला आणि सिंधुदुर्गात सुरू झाला तो फक्त राजकीय संघर्ष…!
सिंधुदुर्गच्या राजकारणात तरुणांचा म्हणावा तेवढा ओढा नव्हता. परंतु समाजवाद्यांच्या नंतर जिल्ह्यात नव्याने आलेल्या शिवसेना, काँग्रेस आदी पक्षांकडे तरुणांचा ओढा राहिला. मुख्यत्वे शिवसेनेकडे तरुण ओढले गेले आणि राजकारणाकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टिकोन बदलला. सुरुवातीस तरुणाईला एखाद्या नेत्याचे आकर्षण वाटू लागले, मोठेपणासाठी म्हणा किंवा त्या नेत्याचा समर्थक बनून झेंडे लावणे, कार्यक्रमांचे नियोजन करणे अशी विविध कामे स्वतःहून करणे या सवयी अंगवळणी पडल्या. मग राजकारण हाच आजच्या बदलत्या युगात फार मोठा व्यवसाय बनला. पद आणि आर्थिक प्रतिष्ठा हेच नेत्यांचे मुख्य उद्दिष्ट बनले… राजकारण या भूलभुलैया इंडस्ट्री मध्ये सर्वाधिक तरुणांचा भरणा झाला तिथेच जिल्ह्यातील तरुणांची दिशा आणि दशा दोन्ही बदलल्या. “इझी मनी”…तरुणांच्या राजकीय आकर्षणाचा मुख्य हेतू बनला कारण, काही तथाकथित राजकीय पदाधिकारीच वळले अवैध व्यवसायाकडे…! …आणि मटका, जुगार, दारू, चरस, गांजा असे अनेक गैरधंदे जिल्ह्यात फोफावू लागले. “आयजीच्या जीवावर बायजी उदार” …या म्हणीप्रमाणे गरजवंताच्या जमीन किसपट भाव देऊन खरेदी करणे आणि करोडोच्या भावात विक्री करणे हा सुद्धा मोठा व्यवसाय झाला. यासाठी तरुणांची मोठी फौज आवश्यक होती. ती उभी करण्यासाठी राजकीय पक्षांचा आधार घेतला गेला. स्वतःच्या नावाचा गाजावाजा करून तरुणांना आपल्याकडे आकर्षून घेतलं जाऊ लागलं. राजकीय प्रवाहात आलेल्या तरुणांमध्ये पार्ट्या, दारू आणि बक्कळ पैशांचे आकर्षण वाढू लागले. हळूहळू हीच तरुणाई या अवैध धंद्यांमध्ये कधी एजंट, कधी मध्यस्थ, कधी सहकारी म्हणून वावरू लागली.
मटक्यासारखा व्यवसाय सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आर्थिक गणित चालवतो असे म्हटल्यास वावगे ठरू नये…आणि मटका उद्योगाला सिंधुदुर्गात कोणाचा राजाश्रय आहे..? हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही. कारण, मटका व्यवसाय करणारेच काही सत्ताधारी तर काही राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आहेत, याचाच अर्थ या व्यावसायिकांना राजकीय आश्रय आहे. हे अवैध धंदे करणारे व्यावसायिक म्हणजेच राजकीय पक्षांची टाकसाळ असतात. राजकीय पक्षाच्या कार्यक्रमांचे बॅनर कसे लावायचे आणि किती, कुठे कुठे लावायचे, नेत्यांच्या स्वागताचा कार्यक्रम कसा घ्यायचा? याची सर्व तयारी म्हणा किंवा त्याला लागणारे आर्थिक पाठबळ हे अवैध्य व्यवसाय करणारेच देतात. एवढी दयनीय अवस्था असते का राजकीय पक्षांची..? नाही, पण जर अवैध्य व्यावसायिकांना आश्रय द्यायचा तर त्याचा मोबदला अशा कुठल्याही मार्गांनी घेतला जातो. बाकी त्यातून इतर उत्पन्न काय मिळते…? याचा विचार न केलेलाच बरा, कारण आता आम.निलेश राणे यांनी सर्वच राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे पंख छाटले आणि पत्रकार परिषद घेत तो आकडा जगजाहीर केला ज्यामुळे सिंधुदुर्गातील पोलिस खात्याची इज्जत पत्रदेवीच्या सीमेवर टांगली गेली आणि राजकीय पक्षांचे, पोलिस खात्याचे व अवैध व्यावसायिकांचे लागेबांधे असतात हे स्पष्ट करून टाकले.
सिंधुदुर्गात असे इतरही व्यवसाय आहेत ज्यामुळे मोठे आर्थिक गणित घडते आणि बिघडते आहे. त्यात प्रमुख म्हणजे गोवा बनावटीच्या भेसळयुक्त दारूची वाहतूक आणि विक्री. संपूर्ण कडक बंदोबस्त असताना देखील गोवा सीमेवरून अस्पष्ट अक्षरे, फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या गाड्या दारू भरलेली असतानाही सहिसलात सुटतात आणि एक बाटली आणणारे मात्र पकडले जातात. सिंधुदुर्ग सीमेवर तर लक्झरी गाड्या रात्रीच्या वेळी सुद्धा तपासल्या जातात, गाडीत भरलेल्या बॅगा, कपडे रस्त्यावर काढले जातात. प्रवाशांना नाहक पोलिस त्रास देतात, एखादा असतो एखाद दुसरी बाटली नेणारा आणि काळ्या काचेच्या, नंबर प्लेटवर अक्षरे न दिसणाऱ्या, दारूचे बॉक्स तुडुंब भरलेल्या गाड्या सहज नाक्यांवरून सोडल्या जातात.
सिंधुदुर्गात असेही एक वैशिष्ट्य पाहायला मिळते ते म्हणजे चांगल्या घरातील काही मुली दुचाकी गाड्यांवरून दोन पायांच्या मध्ये बिसलेरीच्या 5/10 लिटरचे कॅन ठेऊन दारूची खुलेआम वाहतूक करतात. लेडीज असल्याने त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष होतो. दारू, मटका आदी पोचविण्याकामी मिळणारा बक्कळ पैसा आज सिंधुदुर्गातील तरुणाई बिघडवत आहे…परंतु ज्या धंद्यांना राजकीय आश्रय असतो ते धंदे जोमाने चालतात याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा..! सत्तेतील आमदारच जेव्हा पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं करतात तेव्हा “डाळीत काहीतरी काळेबेरे आहे” असे म्हणता येणार नाही तर “अवघी डाळ काळी आहे” असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

एकीकडे जिल्ह्यातील युवाई दिशा भरकटून भलतीकडेच जात असताना दिसत आहे अशावेळी संवाद मिडीयाने अवैध्य धंद्यातील एक मुख्य व्यवसाय म्हणजे मटका याची दुसरी बाजू समजून घेतली, लोकांकडून अवैध्य धंद्याबाबत विचार जाणून घेतले तेव्हा, सिंधुदुर्गात रोजगार नाहीत, आणि बाहेर जाऊन काम करण्याची आमची ऐपत नाही, त्यामुळे शिकून सुद्धा आम्ही सिंधुदुर्गात राहिलो. जिल्ह्यात रोजगार नसल्याने कुटुंब चालवताना तारेवरची कसरत करावी लागते म्हणून मटक्या सारखा व्यवसाय आम्ही निवडला. असे काहीजण सांगतात. मुलांचे महागडे शिक्षण, महागाई यामुळे जीवन जगणे कठीण आहे, म्हणून मजबुरीने हा व्यवसाय करतो. एक मटका स्टॉल दिवसाला किमान २ हजार कमावतो, दुसऱ्या व्यवसायात असा पैसा नाही. परंतु, या व्यवसायात आपल्या मुलानी यावे अशी मटका स्टॉल धारकांची अपेक्षा नाही, मुलांचे शिक्षण आणि आम्हाला रोजगार नाही, पैशांअभावी आम्हाला शिक्षण मिळाले नाही, निदान मुलांना तरी चांगले शिक्षण मिळावे म्हणून या व्यवसायात आपण पडलो अशा प्रामाणिक प्रतिक्रिया काही मटका व्यावसायिकांनी दिल्या.
निसर्ग सौंदर्याने सुजलाम सुफलाम असलेल्या जिल्ह्यात नेते, मंत्री संत्री खूप झाले परंतु बॅ.नाथ पै, मधु दंडवतेंच्या सारखे निस्वार्थी नेते पुन्हा होणे नाही असेच दुर्दैवाने म्हणावे लागते. कारण, जिल्हा आजही फक्त बेरोजगार निर्मिती करतो आहे आणि पोट भरण्यासाठी मुंबई पुण्याकडे पाठवतो आहे, त्याचे सोयरसुतक कुठल्याही राजकीय नेत्याला किंवा पक्षाला नाही…ते कार्यकर्त्यांची भरती करून आले दिवस ढकलत आहेत…तरी आम्ही म्हणतो आहोत…सिंधुदुर्ग जिल्हा बदलतोय…अधोगतीकडे जातोय..!

प्रतिक्रिया व्यक्त करा