आंबोलीतील राज्यस्तरीय मुख्याध्यापक कृतिसत्राला शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती
शिक्षकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयांचे आश्वासन; शिक्षण क्षेत्रातील बदलांवर सखोल मार्गदर्शन
आंबोली, ता. सावंतवाडी :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुखाध्यापक संघ महामंडळ, मुंबई यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय चर्चा व कृतिसत्राला कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या आंबोली येथील सिंधुदुर्ग सैनिक स्कूलमध्ये ७ व ८ जून २०२६ रोजी हे दोन दिवसीय कृतिसत्र आयोजित करण्यात आले असून त्याचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाने केले आहे.
कृतिसत्राच्या पहिल्या दिवशी उद्घाटन सोहळा आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिंधुदुर्ग सैनिक स्कूलचे चेअरमन सुनिल राऊळ होते. राज्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तानाजी माने यांनी प्रास्ताविक केले.
दुसऱ्या सत्रात सहाय्यक शिक्षण संचालक श्रीराम पानझाडे यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन केले. शिक्षण क्षेत्रातील नव्या धोरणात्मक बदलांबरोबरच तांत्रिक अडचणी, प्रशासनाच्या भूमिका आणि भविष्यातील शैक्षणिक दिशा यावर त्यांनी सविस्तर विवेचन केले. शिक्षक, विद्यार्थी आणि शासन यांचे हित जपत सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना पानझाडे यांनी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या कार्याचा विशेष गौरव केला. डोंगराळ व दुर्गम भागातील शाळांमधील विद्यार्थीसंख्या कमी झाल्यामुळे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. हा प्रश्न सोडविण्यासाठी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात बैठक घेऊन इयत्ता नववी व दहावीच्या वर्गासाठी किमान पटसंख्या २० करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंजूर करून घेण्यात आला. या निर्णयाचा राज्यातील ९०० हून अधिक शाळांना लाभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिक्षण आयुक्त, शिक्षण संचालक, प्रधान सचिव, शिक्षणमंत्री तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी सातत्याने संपर्क ठेवून शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापक संघाचे सचिव सागर नंदकुमार, उपाध्यक्ष सचिन नलावडे, सुनील घुगरे, सुनील पंडित, माजी अध्यक्ष जे के पाटील, विद्या समिती सचिव संजय झांबरे, वामन तर्फे, घावरे, एम जी जी मातोंडकर यांच्यासह जिल्ह्यातील व राज्यातील अनेक मुख्याध्यापक, पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
