श्रमदानातून साकारला स्मशानभूमीकडे जाणारा चिरेबंदी मार्ग
मांडवफातरवाडी ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम; उद्योजक सुरेश तावडे यांचे मोलाचे सहकार्य
सावंतवाडी
ओटवणे येथील मांडवफातरवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदानाच्या माध्यमातून स्मशानभूमीकडे जाणारा मजबूत व सुरक्षित चिरेबंदी मार्ग साकारला आहे. ग्रामस्थांच्या या लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
ओटवणे मुख्य रस्त्यापासून काही अंतरावर उंचावर मांडवफातरवाडीची स्मशानभूमी आहे. या ठिकाणी जाणारा मार्ग उताराचा असल्याने विशेषतः पावसाळ्यात अंत्ययात्रा नेणे धोकादायक ठरत होते. ही अडचण लक्षात घेऊन ग्रामस्थांनी श्रमदानातून चिरेबंदी मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला.
यानुसार ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मार्गावर एकामागोमाग एक चिरे उभे रचून मजबूत पायवाट तयार केली. उंचावर असलेल्या या मार्गाचे पावसाच्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पारंपरिक पद्धतीने टिकाऊ आणि भक्कम चिरेबंदी बांधकाम करण्यात आले. त्यामुळे स्मशानभूमीकडे जाणे आता अधिक सुरक्षित आणि सुलभ झाले आहे.
मांडवफातरवाडी ग्रामस्थांनी लोकसहभाग आणि श्रमदानाच्या जोरावर उभारलेला हा उपक्रम इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
उद्योजक सुरेश तावडे यांचे मोलाचे योगदान
ओटवणे गावचे मुंबईस्थित उद्योजक सुरेश तावडे यांच्या संकल्पनेतून ही स्मशानभूमी साकारण्यात आली असून तिच्या उभारणीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या या चिरेबंदी मार्गासाठी आवश्यक चिरेही त्यांनी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या सहकार्याबद्दल मांडवफातरवाडी ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
