२४ तासांपासून वीजपुरवठा खंडित; फोंडाघाटमधील व्यापाऱ्यांचा महावितरण कार्यालयावर घेरावाचा इशारा
व्यापारी अध्यक्ष मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली उद्या आंदोलन; बाजारपेठेतील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी
फोंडाघाट :
फोंडाघाट बाजारपेठ परिसरातील वीजपुरवठा गेल्या २४ तासांपासून खंडित असल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. सततच्या वीजखंडितामुळे व्यापारावर परिणाम होत असून नागरिकांनाही मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर फोंडाघाटमधील व्यापाऱ्यांनी उद्या सकाळी महावितरण (एमएसईडीसीएल) कार्यालयावर घेराव घालण्याचा निर्णय घेतला आहे. व्यापारी अध्यक्ष मसुरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून मोठ्या संख्येने व्यापारी सहभागी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
वीजपुरवठा तातडीने पूर्ववत करावा तसेच वारंवार होणाऱ्या वीज समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
