‘संडे ऑन सायकल’ अभियानाला सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद; शेकडो नागरिकांचा सहभाग
फिट इंडिया मिशन अंतर्गत सायकलिंग व धावण्याद्वारे आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश
सावंतवाडी :
भारत सरकारच्या फिट इंडिया मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘संडे ऑन सायकल’ अभियानास सावंतवाडीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पंचायत समिती सावंतवाडी यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामध्ये सायकलिंग व धावण्याद्वारे नागरिकांना तंदुरुस्त जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.
या अभियानाची सुरुवात तालुका स्कूल क्रमांक १ येथून पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली. त्यानंतर सहभागी नागरिकांनी मोती तलाव मार्गे श्रीमंत बापूसाहेब महाराजांच्या पुतळ्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर अंतर सायकलिंग व धावून पूर्ण केले.
कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती सुष्मिता जाधव, गटविकास अधिकारी निलेश जाधव, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, उपअभियंता (लघु पाटबंधारे) श्री. जुवेकर, गट शिक्षण अधिकारी श्री. शेरलेकर, बाल विकास प्रकल्प अधिकारी सौ. छाया घाडीगावकर, विनायक पिंगुळकर, जितेंद्र सावंत, सौ. शुभदा सावंत तसेच पंचायत समितीचा अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
यावेळी सावंतवाडी येथील मराठा करिअर अकादमीचे सुमारे १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिकांनी उत्साहाने सहभाग नोंदवत नियमित व्यायाम, सायकलिंग आणि आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला.
फिट इंडिया मिशनच्या माध्यमातून नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करून नियमित शारीरिक हालचालींना प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
