You are currently viewing “औषधालाही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही” हा दहशदवाद मोडीत काढत केसरकरांनी जिल्हा केला भगवामय

“औषधालाही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही” हा दहशदवाद मोडीत काढत केसरकरांनी जिल्हा केला भगवामय

महाराष्ट्रात शिवसेना सत्तेत बसताच लढवय्या नेत्याचे केले खच्चीकरण

भूमिकेचे मतदार संघात स्वागत; विकासाला मिळणार चालना

शिवसेनेला रामराम करून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेना बॅकफूटवर गेली होती. “औषधालाही सेना शिल्लक ठेवणार नाही” असे विधान करून राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना जवळ जवळ संपवून टाकली होती.माजी आमदार परशुराम उपरकर हे एकमेव शिवसेनेचे शिलेदार शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन लढत होते. परंतु अशावेळी काँग्रेस पक्षातून शिवसेनेत दाखल झालेले वैभव नाईक यांच्याकडे सेनेचे जिल्हाध्यक्ष पद दिल्यावर जिल्ह्यात शिवसेना पुन्हा रुजू लागली, परंतु नारायण राणे यांना टक्कर देण्याची ताकद त्यावेळी शिवसेनेकडे नव्हती.
राष्ट्रवादीचे आमदार असलेले दीपक केसरकर यांनी राष्ट्रवादीतून उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आणि दहशतवादाच्या मुद्द्यावर केसरकर यांनी राणेंना शह दिला. शिवसेनेने सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात उभारी घेतली. राणेंना टक्कर देण्याची ताकद कोणत्याही विरोधी पक्ष नेत्याकडे नव्हती, परंतु दिपक केसरकर यांनी थंड डोक्याने राणे सेनेच्या विरोधात लढा दिला आणि जवळपास पंचवीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर एकछत्री अंमल असलेल्या नारायण राणे यांना बॅकफूटवर घालवले. एवढेच नव्हे तर कुडाळ मतदारसंघातून शिवसेनेचे वैभव नाईक यांनी दिपक केसरकर यांच्या जोरावर नारायण राणेना पराभूत केले. त्याचप्रमाणे शिवसेना सचिव पदावर कार्यरत असलेले विनायक राऊत यांची जिल्ह्यात म्हणावी तेवढी ओळख नसतानाही खासदारकीच्या रणांगणात बाजी मारण्यातही दीपक केसरकर यांचा सिंहाचा वाटा आहे. एक वेळ नव्हे तर तब्बल दोन वेळा वैभव नाईक व विनायक राऊत हे जिल्ह्यातून निवडून आले हे केवळ दीपक केसरकर यांच्या करिष्मामुळेच शक्य झाले होते. युतीचे सरकार जाऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या तिघांची आघाडी होऊन मुख्यमंत्रीपदावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची वर्णी लागली. युती सरकारच्या काळात गृहराज्यमंत्री म्हणून जबाबदारी उचललेले प्रामाणिकपणे आपल्या पदाला न्याय देणारे दीपक केसरकर यांना मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचा बसूनही मंत्रिमंडळात सहभागी करून घेतले गेले नाही. एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत येऊन मंत्री झालेले दीपक केसरकर राष्ट्रवादीबरोबर शिवसेनेने मंत्रीमंडळ स्थापन करताना युती सरकारकडे असलेली चांदा ते बांदा ही महत्त्वाकांक्षी योजना नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित दादा पवार यांनी बासनात गुंडाळून ठेवली. त्यामुळे दीपक केसरकर शिवसेनेत असूनही दुर्लक्षित राहिले. एक वेळ युतीच्या सरकारमध्ये गृहराज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री पद असलेले दीपक केसरकर यांना शिवसेना संघटनेकडून ही वेळोवेळी दुर्लक्षित ठेवले गेले. त्यामुळे आमदार असूनही त्यांचा राजकीय प्रवास थांबल्या सारखाच वाटत होता.
राज्यसभेच्या निवडणुका व विधान परिषदेच्या निवडणुका संपताच शिवसेनेचे प्रमुख नेते त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे व बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातले आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेले एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेनेच्या जवळपास ४६ आमदारांना आपल्याकडे वळविले. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले, आणि मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडून मातोश्रीकडे प्रयाण केले. एकंदरीत ठाकरे सरकार पायउतार होण्याच्या मार्गावर असतानाच सिंधुदुर्गातील शिवसेनेचे पक्षनिष्ठ आमदार दीपक केसरकर हे एकनाथ शिंदे व इतर आमदार असलेल्या गुवाहाटी येथील हॉटेल कडे जाण्यास रवाना झाले. गुवाहाटी येथील सर्व आमदार असलेल्या हॉटेलमध्ये पोहोचताच एकनाथ शिंदे यांनी दीपक केसरकर यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांचे स्वागत केले. शिवसेनेकडून गेली दोन-अडीच वर्षे दीपक केसरकर यांच्यावर होत असलेला अन्याय तसेच वरिष्ठ नेतृत्वाकडून वारंवार होत असलेला अपमान आदी घटनांकडे पाहता दीपक केसरकर यांनी इतर आमदारां बरोबर बंडात सामील होणे सहाजिकच समजले जात होते. दीपक केसरकर यांच्या निर्णयामुळे महाविकास आघाडी कडून त्याचप्रमाणे पक्ष नेतृत्वाकडून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला त्यांनी स्वतः वाचा फोडल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेकडून ज्या हॉटेलवर आमदारांना ठेवण्यात आले होते त्या हॉटेल वरून बाहेर पडताच दीपक केसरकर यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त करताना, आपल्यामागे शिवसैनिक पाठवून आपल्या घरावर पाळत ठेवल्याचे सांगत आपण संघर्षातूनच पुढे आलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टींना आपण थारा देत नाही, असे सांगून आपल्याला जायचे असेल तर कोणीही अडवू शकत नाही, केवळ जाण्यासाठी भाग पाडू नका असा गर्भित इशारा दिला होता. संवाद मीडियाने यापूर्वीच दिपक केसरकर यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत बऱ्याच वेळा आपल्या संपादकीय मधून लक्ष वेधले होते. परंतु शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही, परिणामी दीपक केसरकर यांनी बंड केलेल्या एकनाथ शिंदे यांच्या जवळ जात आपण भोगलेल्या त्रासाची जाणीव करून दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − one =