You are currently viewing कोऱ्या पाटीने हिंदवी स्वराज्याचा विचार करावा

कोऱ्या पाटीने हिंदवी स्वराज्याचा विचार करावा

 

हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र १६४६ पासून महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून संपूर्ण भारतात पसरले होते. ज्या भारतीय राजांना परकीय सत्तांची गुलामगिरी नको होती. असे सर्व राजे शिवाजी महाराजांकडे येत होते, प्रेरणा घेऊन जात होते. काही भारतीय राजांनी तर एकलव्याप्रमाणे शिवछत्रपतींना आपले गुरु मानले होते. तत्कालीन कागदपत्रावरून हे इतिहासकारांनी आजपर्यंत शोधून काढले आहे. त्यामुळे आपल्याला समजले की, छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती सर्वत्र भारतात पसरलेली होती. याचे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी असाध्य असणाऱ्या सर्व गोष्टी साध्य केल्या होत्या. त्यांनी गनिमीकावा हे युद्धतंत्र वापरून आणि कुशल राजकारण घडवून आणून, परकीय सत्ताधारी सम्राटांना व व्यापाराची ढाल करून सत्ता मिळवणाऱ्या धर्मांध जमातींना शिवरायांनी धुळीला मिळवले होते. अफझल खान, शाहिस्तेखान, सिद्दी जौहर, राजा जयसिंग, डच, इंग्रज, पोर्तुगीज या तीन पाश्चात्य टोळ्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी मोठी मात दिली होती.

अफझल खानाला त्यांनी फाडले होते तर शाहिस्तेखानाची बोटे छाटली होती. तो आपला जीव वाचवून बंगाल प्रांतात गेला होता. राजा जयसिंग व सिद्दी जौहरला शिवछत्रपतींमुळे विषाचा प्याला प्राशन करावा लागला होता. पोर्तुगीज यांच्या गोव्यात त्याचबरोबर इंग्रजांच्या मुंबई बेटावर शिवरायांनी धाक निर्माण केला होता.

या सर्व घडामोडींमुळे भारतातील त्याकाळच्या प्रत्येक सामान्य माणसाला शिवरायांचा शिवप्रताप कळलेला होता. दिल्ली व उत्तर प्रदेशच्या लोकांना शिवाजी महाराजांचे महत्व समजले होते. महाराज आग्रा भेटीला गेलेले असताना औरंगजेबाने त्यांना नजर कैदेत घालून त्यांना जीवे मारण्याचा डाव रचला होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी जबरदस्त खेळी रचून औरंगजेबाची बादशाही उध्वस्त केली होती.

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मुठभर सेनेने आग्रा येथून यशस्वी पलायन केले होते. अफवेची हवा शिवशाहीच्या हेरांनी बेमालूमपणे पसरवली होती. त्यामुळे नेमके शिवाजी महाराज आग्रा येथून कसे निसटले याचे आश्चर्य उत्तर प्रदेशातील हिंदू जनतेला वाटत होते. या आश्चर्यातून महाकवी भूषण याने शिवरायांच्या पराक्रमावर तडाकेबंध कविता लिहिल्या व तिथल्या लोकांमध्ये हिंदवी स्वराज्याविषयी जागृती निर्माण केली. हे करता करता कवी भूषण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज दरबारात आला. त्याच्या या कविता आजही शिवप्रेमींच्या मनात धगधगत आहेत. कवी भूषणने त्यावेळी शिवछत्रपतींना देव मानले होते.

पुढे शिवाजी महाराज हयात असताना कवी कलश हा देखील स्वराज्याच्या भूमीवर आला. युवराज संभाजी महाराजांचा तो मित्र होऊन राहिला. छत्रपती संभाजी महाराजांच्या अंतापर्यंत कवी कलश स्वराज्य धर्माचा पाईक झाला. औरंगजेबाने त्यालाही मारून टाकले. महाराष्ट्राचे कवी परमानंद शिवाजी महाराजांच्या मोहिमेत कायम असायचे त्यांनी शिवभारत नावाचा ग्रंथ शिवाजी महाराजांच्या आज्ञेने लिहिला होता. सर्व कवींना, कलाकारांना छत्रपती शिवाजी महाराज आपले वाटायचे. म्हणून अनेक कलाकार लोक शिवाजी महाराजांच्या हेर खात्यात येत होते. बहुरूपी बनून परकीय सत्ताधाऱ्यांना फसवून त्यांची माहिती काढून आणायचे. स्वराज्याच्या या हेर खात्यात स्त्रिया देखील असायच्या अशाप्रकारे भारतातल्या बहुसंख्य हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांना आपले प्रभू मानले होते.

हे सर्व सांगण्याचा उपदेश हाच आहे. गेल्या दोन, तीन महिन्यापूर्वी बागेश्वर बाबांनी नागपुरात म्हटले होते. समर्थ रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरु होते. एकदा शिवछत्रपतींनी आपले स्वराज्य समर्थ रामदास स्वामींच्या स्वाधीन केले होते. असे बागेश्वर बाबांनी वक्तव्य केले होते. हे त्यांचे वक्तव्य भारतातील काही दंतकथांमधून आलेले होते.

भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या आध्यात्मिक कथांमध्ये शिवाजीराजे व समर्थ रामदास स्वामी यांच्या बाबतीत अशा बऱ्याच गोष्टी घुसवल्या जातात. त्याकडे महाराष्ट्र राज्यातील तसेच महाराष्ट्राच्या बाहेरील हिंदूंनी जास्त विश्वास न ठेवता बाबासाहेब पुरंदरे. निनाद बेडेकर आणि गो. नी. दांडेकर यांच्या ऐतिहासिक साहित्याचा पुरावा लक्षात घ्यावा. हे तीन इतिहासकार आज आपल्यात नसले तरी त्यांची शिष्यपरंपरा खूप मोठी आहे. ती विज्ञान निष्ठ आहे. त्यामुळे सर्व नवीन अभ्यासकांना त्या मंडळींकडून चांगल्यात चांगली सत्य आधारित माहिती मिळू शकेल. ती माहिती भारतातील आणि महाराष्ट्रातील विद्यार्थी, युवांनी जरूर घ्यावी.

वस्तुनिष्ठ इतिहास उजेडात आणण्याकरता खूप प्रयत्न करावे लागतात पण इतिहासाची मोडतोड करायला फार बुद्धीची गरज लागत नाही. त्यामुळे आध्यात्मिक बुवा, बाबांनी महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांचा सारासार अभ्यास करावा. अभ्यास नसेल तर शिवाजी महाराज या गोष्टीवर कधीही बोलू नये, हे त्यांनी लक्षात घ्यावे.

समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म इंग्रजी कॅलेंडरनुसार १६०८ सालात झाला. बालपणापासून समर्थ रामदास स्वामींना श्रीरामाच्या चरित्राची ओढ होती. कारण त्या काळात मुघल व इतर प्रमुख पाच परकीय राजवटींनी एकंदर भारताला गुलामगिरीच्या अमलाखाली आणले होते. अशा काळात समर्थ रामदास स्वामींनी आपल्या श्रीराम चरित्राच्या कार्याला सुरुवात केली होती. त्यांनी बलोपासनेला महत्त्व दिले होते. त्यांनी मठांची व मारुती मंदिरांची निर्मिती केली होती. ते भारतात सर्वत्र फिरले त्यानंतर त्यांनी दासबोध ग्रंथाची निर्मिती केली. मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र व इतर सामाजिक धार्मिक साहित्याची निर्मिती त्यांनी सुरू ठेवली. या काळात समर्थ रामदास स्वामी श्रीराम चरित्र लोकांच्या मनामनात रुजवण्याकरता खूप परिश्रम घेत होते.

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज या काळात स्वराज्य निर्मितीच्या मागे लागले होते. वेगवेगळ्या प्रकारचे पराक्रम शिवाजी राजांनी या काळात केले होते. शेती, कारखाने, व्यापार, सैनिकशक्ती, भाषा, धर्म विषयक विविध कामे शिवराय करत चालले होते. त्यांना एका क्षणाची सुद्धा फुर्सत नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी एकमेकांना कधी भेटले हे निश्चित सांगता येत नाही. समर्थ रामदास स्वामी यांचे शिष्य शिवाजी महाराजांकडे येत होते, अशी काही कागदपत्रे सांगतात. यावरून अंदाज काढता येतो की, शिवाजीराजे तथा समर्थ रामदास स्वामी एकमेकांना भेटले होते परंतु काही ठिकाणी ऐतिहासिक पुराव्यानुसार असेही म्हटले जाते.

शिव- समर्थ या दोघांनी असे ठरवले होते आपण कधीही एकमेकांच्या समोर यायचे नाही. म्हणजे या काळात शिवाजी महाराजांनी समर्थ रामदास स्वामींना गुरु मानले असावे पण शिवाजी महाराज गुरूंच्या हाती स्वराज्य देऊ शकत नव्हते इतके शिवछत्रपती कमजोर मनाचे नव्हते, त्यांनी जिगरबाज होऊन परकीय शत्रूंना धूळ चारली. असा माणूस मनाने कमजोर असू शकत नाही.

शिवाजी महाराज त्या काळात जगद्गुरु तुकाराम महाराजांना सुद्धा भेटले होते. जगद्गुरु तुकाराम महाराज शिवरायाना आपल्या संवादात सहज म्हणाले होते. राजे आपण स्वराज्याचे कार्य करावे, आम्ही धर्माचे कार्य करून स्वराज्याकरता चांगले लढवय्ये सेवक मिळवून देऊ. म्हणजे या दोन महान संतांनी स्वराज्याला बळकटी देण्याचे कार्य केले.

त्यातूनच इतिहासकारांच्या मते १६६० ते १६७० या कालावधीत समर्थ रामदास स्वामी यांनी “निश्चयाचा महामेरु” हे छत्रपती शिवाजी राजांवरचे कीर्ती काव्य लिहिले असावे. या तारखे बाबत अजून निश्चिती झालेली नाही पण हे काव्य आजही स्फूर्ती गीताच्या रूपात आपल्यासमोर येते. आपण हे काव्य नीट वाचून पाहिले असता, आपल्याला असे समजते की, समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना जवळून अनुभवले होते किंवा दुरूनही अनुभवले असेल पण यात एक गोष्ट निश्चित आहे जर का कवी भूषण, कवी परमानंद, कवी कलश दूर दूर वरून शिवाजी महाराजांची कीर्ती गात गात स्वराज्यात येत असतील तर समर्थ रामदास स्वामी शिवाजी राजांना भेटू शकत नाहीत? भेटले तर शिवराय समर्थ रामदास स्वामींना गुरु मानू शकत नाहीत? गुरु मानण्याचे कारण येथे अगदी स्पष्ट आहे.

समर्थ रामदास स्वामी सोळाव्या शतकातले महान संत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात श्रीरामाचे रामराज्य दिसत होते त्याचबरोबर युद्ध प्रसंगी श्रीकृष्ण नीती दिसत होती. यामुळे जगद्गुरु तुकाराम महाराज हे देखील शिवछत्रपतींचे गुरु होते. तुकाराम महाराज हे ही सोळाव्या शतकातले महान संत होते. ते विठ्ठलाचे म्हणजे श्रीहरी कृष्णाचे भक्त होते पण त्याच्या मनात विठ्ठला विषयी अंधश्रद्धा नव्हती तर श्रद्धा होती. म्हणून शिवाजी महाराज या दोन महान संतांना गुरुतुल्य व्यक्ती मानायचे शिवरायांनी याच भावनेतून प्रत्येक साधू संतांचे रक्षण केले होते.

याचा अर्थ समर्थ संप्रदायाने आणि भक्ती संप्रदायाने म्हणजे वारकरी संप्रदायाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा पाया रसला होता. छत्रपती शिवरायांच्या इतिहास संशोधन साधनात असे नमूद केले जाते की, वारकरी किंवा भक्ती संप्रदायाने हिंदवी स्वराज्याला मजबूती दिली. शिवाजीराजांना यामुळे भारी, भक्कम प्रामाणिक मावळे मिळत गेले.

त्या जोरावर १६४६ ते १६७४ या काळात स्वराज्य मजबूत ताकदवर झाले. मग शिवाजीराजांनी रयते करता छत्रपती सम्राट पद मिळवले. म्हणून म्हणतात शिवशाहीचे हे स्वराज्य रयत क्रांतीतून निर्माण झाले होते. तिथून पुढे ही शिवशाही भारतभर ताकदीने पसरली, हा इतिहास सर्वांना ठाऊक आहे. यामुळे कुणीही छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या नात्याबद्दल प्रश्न उपस्थित करु नयेत आणि चुकीच्या वक्तव्यातून उगाच वादविवाद निर्माण करु नयेत. जातीच्या व दुराग्रहाच्या पलीकडे जाऊन कोऱ्या पाटीने हिंदवी स्वराज्याचा आपण सर्वांनी अभ्यास करायला हवा.

ॲड. रुपेश पवार

9930852165

प्रतिक्रिया व्यक्त करा