वैभववाडी महाविद्यालयाच्या दोन एनसीसी कॅडेट्सची मुंबई पोलिस दलात निवड
वैभववाडी
वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागाच्या बॅच २०२३-२४ मधील दोन कॅडेट्सची मुंबई पोलीस शिपाई भरती २०२४-२५ मध्ये निवड झाली आहे. या यशामुळे महाविद्यालय आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्यालयातील कॅडेट अक्षय मोपेरकर-उंबर्डे (बी.एस्सी.) आणि कॅडेट विठ्ठल संजय गुरव-कोते-राधानगरी (बी.ए.) यांनी कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि जिद्दीच्या बळावर हे यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, दोघांकडेही एनसीसीचे “सी” प्रमाणपत्र असल्यामुळे त्यांना भरती प्रक्रियेत अतिरिक्त ५ बोनस गुण मिळाले. या गुणांचा अंतिम गुणवत्ता यादीत महत्त्वपूर्ण फायदा होऊन त्यांची निवड निश्चित होण्यास मदत झाली. एनसीसी प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, संघभावना आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित होते. या गुणांचा उपयोग स्पर्धा परीक्षा तसेच सैन्य, पोलीस आणि इतर शासकीय सेवांमधील भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात होत असल्याचे या यशातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
या यशामागे 58 महाराष्ट्र बटालियन NCC यांचे मार्गदर्शन, महाविद्यालयातील एनसीसी विभागाचे प्रशिक्षण तसेच शिक्षकांचे सहकार्य लाभले. कॅडेट्सच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी, संस्था पदाधिकारी, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. दोन्ही कॅडेट्सच्या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एनसीसी हे करिअर घडविण्याचे प्रभावी व्यासपीठ असल्याचे अधोरेखित झाले असून त्यांच्या यशोगाथेतून इतर युवकांनाही प्रेरणा मिळत आहे.
