You are currently viewing अवैध धंद्यांविरोधातील आमदार निलेश राणे यांची भूमिका समाजहिताची; सतीश आचरेकर यांचे समर्थन
Oplus_16908288

अवैध धंद्यांविरोधातील आमदार निलेश राणे यांची भूमिका समाजहिताची; सतीश आचरेकर यांचे समर्थन

युवकांचे भवितव्य, कायदा-सुव्यवस्था आणि विकासाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणाऱ्या आमदार निलेश राणे यांचे कौतुक

मालवण :

जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कमी पडत असून या बेकायदेशीर व्यवसायांमुळे समाजाची घडी विस्कटत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी नुकत्याच पत्रकार परिषदेत मांडलेली भूमिका ही जनतेच्या भावना व्यक्त करणारी आणि समाजहिताचा विचार करणारी असल्याचे मत मालवणमधील पर्यटन व मत्स्यव्यावसायिक सतीश आचरेकर यांनी व्यक्त केले आहे.

गेल्या काही वर्षांत जिल्ह्यात विविध प्रकारच्या अवैध धंद्यांचे प्रमाण वाढल्याबाबत नागरिकांकडून सातत्याने चिंता व्यक्त होत आहे. दारू, जुगार आणि इतर बेकायदेशीर प्रकारांमुळे अनेक युवक चुकीच्या मार्गाकडे वळत असून व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम कुटुंबव्यवस्था, सामाजिक वातावरण आणि युवकांच्या भवितव्यावर होत असल्याने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर आमदार निलेश राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सिंधुदुर्ग पोलीस दलातील काही घटकांकडून कथितपणे हप्ते घेतले जात असल्याचा गंभीर आरोप केला. तसेच अवैध धंद्यांना काही स्तरांवरून संरक्षण मिळत असल्याचाही दावा त्यांनी केला. यासंदर्भात काही नावेही पत्रकार परिषदेत मांडण्यात आली. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

पत्रकार परिषदेत मांडलेले मुद्दे हे केवळ राजकीय नसून सामाजिक जबाबदारीतून व्यक्त केलेले असल्याचे अनेकांनी नमूद केले आहे. आमदार निलेश राणे हे जागरूक लोकप्रतिनिधी म्हणून जिल्ह्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, हे या भूमिकेतून स्पष्ट होत असल्याचे सतीश आचरेकर यांनी म्हटले.

सतीश आचरेकर पुढे म्हणाले की, समाजात वाढत असलेल्या या समस्यांवर वेळेत नियंत्रण मिळविले नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते. अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई व्हावी, कायदा व सुव्यवस्थेची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे व्हावी आणि युवकांना सुरक्षित, सकारात्मक वातावरण मिळावे, हीच समाजाची अपेक्षा आहे.

कुडाळ-मालवण मतदारसंघाच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, गेल्या दहा वर्षांत अनेक क्षेत्रांत अपेक्षित गतीने विकास झाला नसल्याची भावना नागरिकांमध्ये होती. पायाभूत सुविधा, रोजगार, पर्यटन, शिक्षण आणि विविध विकासकामांच्या बाबतीत निर्माण झालेला बॅकलॉग भरून काढण्याचे मोठे आव्हान होते. मात्र आमदार निलेश राणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विविध विकासकामांना गती मिळाल्याचे चित्र दिसून येत आहे.

मतदारसंघातील रस्ते, पर्यटनवाढ, स्थानिक प्रश्न, युवकांसाठी संधी आणि विकासकामांच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. विकास आणि समाजहित या दोन्ही मुद्द्यांना प्राधान्य देत काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही सतीश आचरेकर यांनी नमूद केले.

समाजातील वाढत्या समस्यांविरोधात स्पष्ट भूमिका घेणे, युवकांच्या भवितव्याचा विचार करणे आणि विकासाच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठविणे ही लोकप्रतिनिधी म्हणून असलेली जबाबदारी आमदार निलेश राणे योग्य प्रकारे पार पाडत आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघातील जनतेने योग्य नेतृत्वाच्या हातात सत्ता दिल्यामुळे आमदार निलेश राणे यांच्या रूपाने सडेतोड, स्पष्टवक्ते आणि जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारे नेतृत्व मतदारसंघाला लाभल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा