भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट…..
_*ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव….*_
_यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली आहे. कोल्हापूर येथील संजय घोडावत युनिव्हर्सिटीतून त्यांनी ऑटोमोबाईल रेडिएटरमध्ये नॅनोपार्टिक्युलेट बायनरी फ्लुइडच्या सहाय्याने उष्णता हस्तांतरण वाढविणे या विषयावर संशोधन पूर्ण केले._
_या संशोधनाचा उपयोग वाहनांच्या रेडिएटरची कार्यक्षमता वाढविण्यासाठी होणार असून त्यामुळे इंजिनचे तापमान अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येईल. परिणामी इंधन कार्यक्षमता, इंजिनचे आयुष्य आणि वाहनांची एकूण कामगिरी सुधारण्यास मदत होणार आहे. २०१९ मध्ये नोंदणी केल्यानंतर सहा वर्षांच्या परिश्रमानंतर त्यांनी ही पदवी प्राप्त केली. या यशाबद्दल श्री यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटीतर्फे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांनी डॉ.लांजेकर यांचे अभिनंदन करताना शिक्षकांनी उच्च शिक्षण पूर्ण करून आपले ज्ञान अद्ययावत ठेवावे आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श निर्माण करावा, असे मत व्यक्त केले._
_सत्काराला उत्तर देताना डॉ.लांजेकर यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, मार्गदर्शक व सहकाऱ्यांना दिले. कार्यक्रमाला अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंत भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक, सीईओ ले.कर्नल रत्नेश सिन्हा (नि.), प्राचार्य डॉ. रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले तसेच शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते._
