लोरे येथे भाजपाच्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
कार्यालय हे जनसेवेचे केंद्र; योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवा : पालकमंत्री नितेश राणे
वैभववाडी
केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यावर आहे. पक्षाचे कार्यालय हे केवळ राजकीय कार्याचे ठिकाण नसून जनतेसाठी सेवा केंद्र आहे. त्यामुळे कार्यालयाचे पावित्र्य जपत नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
लोरे येथे भाजपाच्या विभागीय कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी वैभववाडी भाजपा मंडल अध्यक्ष सुधीर नकाशे, सभापती सिद्धेश रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, भालचंद्र साठे, रिद्धी सुतार, साची कोलते, देवानंद पालांडे, महेश संसारे, प्राची तावडे, मंगेश लोके, रितेश सुतार, विलास नावळे, प्रकाश गव्हाणकर, उद्योजक अनंत मांजलकर, संजय सावंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नितेश राणे म्हणाले की, कार्यालयातील नेत्यांचे छायाचित्र हे कार्यकर्त्यांसाठी प्रेरणास्थान आहे. कार्यालयीन कामकाजात शिस्त, नियोजन आणि सातत्य यांना विशेष महत्त्व असून प्रत्येक कार्यकर्त्याने नियमितपणे कार्यालयात उपस्थित राहावे. कार्यालयाचा वर्धापन दिन साजरा करून त्याद्वारे लाभार्थ्यांना मिळालेल्या सुविधांचा आढावा घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
या कार्यालयाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघात अशा प्रकारची सेवा केंद्रे उभी राहून जनतेला शासकीय योजनांचा लाभ सहज उपलब्ध व्हावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात लोरे जिल्हा परिषद गटाच्या वतीने पालकमंत्री नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक अनंत मांजलकर यांचाही नितेश राणे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रितेश सुतार यांनी केले.
