अमरावतीच्या सुप्रसिद्ध अशा व महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या व विदर्भात सर्वदूर विस्तार असलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक कृषी मंत्री डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांच्या जीवनावर विद्यातीर्थ या कादंबरीचे लेखन सुरू असून ही कादंबरी मराठीतील सुप्रसिद्ध लेखक व ज्यांनी आजवर 200 पुस्तके प्रकाशित केलेली आहेत असे वर्धा येथील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयातील मराठीचे माजी प्राध्यापक नवनीत देशमुख यांनी कादंबरी लेखनाला सुरुवात केली आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्य अफाट आहे. पण त्यांच्या जीवनावर पुरेशी पुस्तके उपलब्ध नाहीत .शिवाय जी पुस्तके उपलब्ध आहेत ती मराठी भाषेमध्ये आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे कार्य लक्षात घेता त्यांच्यावर अधिकाधिक पुस्तके ध्वनिफिती चित्रपट डॉक्युमेंटरी सातत्याने समाजासमोर सादर करण्यात करण्याची गरज आहे.
डॉ.पंजाबराव देशमुख यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी विद्यातीर्थ ही कादंबरी लोकांसमोर येणार आहे .या कामी मिशन आय ए एस चे संचालक व डॉ.पंजाबराव देशमुख जन्मशताब्दी समितीचे सरचिटणीस व सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा तज्ञ प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी प्रा. नवनीत देशमुख यांची भेट घेतली. नवनीत देशमुख यांनी नुकतीच अमरावतीच्या माजी पालकमंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांच्या जीवनावर वसुधा ही प्रदीर्घ कादंबरी लिहिली आहे. हा संदर्भ लक्षात घेऊन प्रा. काठोळे यांनी श्री नवनीत देशमुख यांना विनंती केली व पंजाबरावांच्या जीवनावर कादंबरी लिहिण्याची विनंती केली .त्यांनी ती स्वीकारली असून या विद्यातीर्थ कादंबरीचे पहिले प्रकरण तयार झाले आहे.
या कादंबरीच्या संदर्भात प्रा. नवनीत देशमुख प्रा. अनुप्रिता देशमुख व श्री देशमुख डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतणी श्रीमती रजनी देशमुख यांच्या मुलाखती झाल्या असून त्यांच्या समवेत डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या पापळला व तेथील पंजाबरांव देशमुख यांच्या घराला व परिसराला या चमूने भेट दिली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर यापूर्वी आमदार प्रा. बी टी देशमुख यांचे सहकारी प्रा. पी एन देशमुख यांच्या अर्धांगिनी प्रा. कल्पना देशमुख यांनी भाऊ नावाची कादंबरी लिहिलेली आहे. डॉ.पंजाबराव देशमुख यांचे कार्य सर्वदूर पसरविण्यासाठी सातत्याने त्यांच्यावर लेखन करणे गरजेचे आहे .हा विचार लक्षात घेऊनच मिशन आयएएसने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर युगनिर्माता नावाचे नाटक लिहिले असून त्याचे महाराष्ट्रात ठिकाणी प्रयोग झाले आहेत.
मिशन आयएएसने डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षात एकंदर अठरा पुस्तकांचे प्रकाशन केले असून त्यांच्या जीवनावर पंडित प्रा.डॉ. भोजराज चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली लोक महर्षी हा संगीतमय कार्यक्रम बसविलेला आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जीवनावर प्रा. नवनीत देशमुख हे कादंबरी लिहीत आहेत ही सर्व शिवप्रेमीसाठी आनंदाची बाब आहे .या कादंबरीचे लेखन झपाट्याने सुरू असून येत्या 27 डिसेंबरला डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या मुख्य समारंभात या कादंबरीचे प्रकाशन करण्याचा संयोजकांचा संकल्प आहे. या कादंबरीचे सर्व शिव परिवारात तसेच डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यावर प्रेम करणाऱ्या व भारतात सर्वत्र विखुरलेल्या पंजाबराव प्रेमी तर्फे स्वागत होईल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
