तारकर्ली-देवबागची शेवटची एसटी फेरी बंद; प्रवाशांचे हाल
बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यासाठी मनसेचे स्थानकप्रमुखांना निवेदन; नवीन गाड्यांसाठी परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार
मालवण :
आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास आलेल्या तारकर्ली आणि देवबाग गावांना जोडणाऱ्या मालवण–तारकर्ली–देवबाग मार्गावरील सायंकाळी ७.१५ वाजताची शेवटची एसटी बसफेरी गेल्या काही दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. ही बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी गुरुवारी येथील स्थानकप्रमुखांना निवेदन सादर केले.
या मार्गावरील शेवटची बसफेरी बंद झाल्यामुळे स्थानिक नागरिक, नोकरदार, विद्यार्थी आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत असून, त्यांना आर्थिक व मानसिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याकडे मनसेने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तारकर्ली आणि देवबाग परिसरातील अनेक युवक-युवती, कामगार आणि व्यावसायिक दिवसभर कामानिमित्त मालवण शहरात येत असतात. बाजारपेठेतील तसेच कार्यालयीन कामकाज आटोपल्यानंतर रात्री गावाकडे परतण्यासाठी सायंकाळी ७.१५ ची बस हीच सुरक्षित आणि विश्वासार्ह सुविधा होती. मात्र, ही फेरी अचानक बंद झाल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.
नागरिकांना आता नाईलाजाने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत असून, त्यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. पावसाळी वातावरणामुळे अधिकृत पर्यटन हंगाम संपला असला तरी तारकर्ली-देवबाग परिसरात वर्षभर पर्यटकांची काही प्रमाणात वर्दळ असते. बसफेरी बंद झाल्याने पर्यटकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर स्थानकप्रमुख श्री. गडदे आणि मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. यावेळी आगार प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना श्री. गडदे यांनी सांगितले की, मालवण आगारातील तब्बल १९ गाड्या वयोमानानुसार निर्लेखित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या आगारात गाड्यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शासनाकडून नवीन दहा गाड्या मंजूर झाल्या असल्या तरी त्या अद्याप आगारात दाखल झालेल्या नाहीत. नवीन गाड्या लवकर उपलब्ध व्हाव्यात यासाठी वरिष्ठ स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याची गरज व्यक्त केली. मालवण आगाराला मंजूर झालेल्या नवीन दहा गाड्या त्वरित उपलब्ध व्हाव्यात आणि प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, यासाठी आपण स्वतः राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विस्कळीत झालेली बस सेवा लवकर सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.
