*पारिजात साहित्य समूह सदस्या कवयित्री गझलकारा डॉ.शरयू शहा लिखित अप्रतिम गझल*
वनहरिणी
८ ८ ८ ८ / ३२
निरपेक्षपणे सुगंध द्यावा, कसे काय हे फुलास कळते
स्वार्थ सोडुनी जरा जगावे, हेच कधी ना जगास कळते
क्रूर कुणी का इतके असते, सहजपणाने जीवच घेते
समोरच्याचा जीव जपावा, कसे इवलुशा, मुलास कळते
नीतीमूल्ये जपत जगावे, मुलांवरी संस्कार घडावे
बंधनात सुरक्षित आपण, प्रत्येक माय पित्यास कळते
मनात काही नाही अपुल्या, गैर अर्थ पण कसे काढती
परिणामाचा विचार नाही, सरळ मन कुठे सख्यास कळते
तीव्र दुष्काळ जिकडे तिकडे, जलाविना जन व्याकुळ सगळे
गरज तेथेच बरसावे हे, कसे तेच ना ढगास कळते
डॅा.शरयू शहा.
