You are currently viewing “स्वच्छ सिंधुदुर्ग सुंदर सिंधुदुर्ग” अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

“स्वच्छ सिंधुदुर्ग सुंदर सिंधुदुर्ग” अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

“स्वच्छ सिंधुदुर्ग सुंदर सिंधुदुर्ग” अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी

घनकचरा व्यवस्थापन नियम, २०२६ (SWM Rules, 2026) यांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषद सिंधुदुर्ग प्रशासनाने व्यापक स्तरावर नियोजन सुरू केले असून सर्व ग्रामपंचायती, पंचायत समित्या व संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, राज्य पाणी व स्वच्छता मिशन तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ग्रामीण भागातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम व शाश्वत करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.

“स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छ आणि पर्यावरणपूरक सिंधुदुर्ग घडविण्यासाठी ग्रामपंचायतींनी कचरा व्यवस्थापनाच्या उपाययोजना प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक आहे. ओला व सुका कचरा विभाजन, घराघरांतून कचरा संकलन, प्लास्टिकमुक्त गाव संकल्पना आणि सेंद्रिय खत निर्मिती यावर विशेष भर दिला जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा.” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले. तसेच “मा. सर्वोच्च न्यायालयाने घनकचरा व्यवस्थापनाबाबत दिलेल्या निर्देशांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना Form-IV माहिती अद्ययावत ठेवणे, गावस्तरावर निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे तसेच स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)-२ अंतर्गत निर्धारित उद्दिष्टांची पूर्तता करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Phase-I Targets पूर्ण करण्यासाठी ग्रामपंचायतींनी तातडीने कार्यवाही करून कचरा संकलन, वर्गीकरण, प्रक्रिया व विल्हेवाट यंत्रणा सक्षम करावी.” असे हि मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी सांगितले आहे.

घनकचरा व्यवस्थापन नियमांतर्गत गावपातळीवर कचरा वर्गीकरण, कंपोस्ट निर्मिती, प्लास्टिक कचऱ्याचे वेगळे संकलन, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, बाजारपेठ परिसरातील कचरा नियंत्रण तसेच शाळा, अंगणवाडी व शासकीय कार्यालय परिसर स्वच्छ ठेवण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. तसेच ग्रामस्वच्छता समित्या, बचतगट, युवक मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्हा परिषद प्रशासनामार्फत पंचायत समिती स्तरावर नियमित आढावा घेण्यात येणार असून ग्रामपंचायतींच्या कामकाजाचे मूल्यांकन केले जाणार आहे. स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देण्याचाही मानस प्रशासनाने व्यक्त केला आहे.

नागरिकांनी घरातील ओला व सुका कचरा वेगळा ठेवणे, प्लास्टिकचा वापर कमी करणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणे आणि ग्रामपंचायतींना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. स्वच्छता ही आरोग्य, पर्यावरण आणि विकासाशी निगडित बाब असल्याने प्रत्येक नागरिकाने या मोहिमेत सहभागी होऊन “स्वच्छ सिंधुदुर्ग सुंदर सिंधुदुर्ग” अभियान यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने याचा लाभ पर्यटन वाढी करीता होणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा