सिंधुदुर्गात गो-तस्करीविरोधात प्रशासनाची मोठी कारवाई; सीमांवर १३ संयुक्त तपासणी नाके सुरू
गोवा-कर्नाटक सीमावर्ती भागात २४ तास कडक तपासणी; संशयित वाहनांची होणार झडती
सिंधुदुर्गनगरी :
गो-तस्करी आणि गोवंशाची अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मोठी आणि धडक मोहीम हाती घेतली आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या कडक परिपत्रकानंतर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंतरराज्य सीमावर्ती भागात २४ तास कार्यरत राहणारे १३ संयुक्त तपासणी नाके सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
२५ मे रोजी रात्री ८ वाजल्यापासून ही व्यवस्था लागू करण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत ती कायम राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा गोवा आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेलगत असल्याने या भागातून होणारी अवैध वाहतूक आणि संभाव्य गो-तस्करी रोखण्यासाठी ही प्रभावी नियंत्रण यंत्रणा उभारण्यात आली आहे.
या आदेशानुसार सीमावर्ती भागातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनाची जागेवरच कसून तपासणी केली जाणार आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ तसेच प्राण्यांना निर्दयपणे वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० या कायद्यांची जिल्ह्यात काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे तपासणी नाक्यांवर केवळ पोलीसच नव्हे, तर महसूल विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विभाग, ग्रामपंचायत विभाग आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी व कर्मचारीही २४ तास तैनात राहणार आहेत. सावंतवाडी आणि कणकवली येथील उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सातार्डा, आरोंदा, इन्सुली, विजघर, आयी, रेडी, तेरवन तिठा, फोंडाघाट, खारेपाटण, करूळ, भुईबावडा, ओंबेरी आणि आंबोली या १३ ठिकाणी संयुक्त तपासणी नाके सुरू करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे गो-तस्करीला मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
