You are currently viewing वादळी वाऱ्याचा तडाखा; समुद्रात बोट बुडाली, एक मच्छीमार बेपत्ता

वादळी वाऱ्याचा तडाखा; समुद्रात बोट बुडाली, एक मच्छीमार बेपत्ता

केरवाडी किनाऱ्याजवळ दुर्घटना; सहकाऱ्यांच्या मदतीने पिता-पुत्र बचावले

वेंगुर्ले :

शिरोडा-केरवाडी येथील समुद्रात मच्छीमारीसाठी गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघेजण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राजन सारंग (वय ४६, रा. केरवाडी) असे बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे.

शिरोडा-केरवाडी येथील रहिवासी आणि व्यावसायिक मच्छीमार प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी सारंग आणि त्यांचा भाऊ राजन सारंग हे तिघेजण शुक्रवारी पहाटे नेहमीप्रमाणे मच्छीमारीसाठी समुद्रात गेले होते. मच्छीमारी सुरू असतानाच समुद्रात अचानक जोरदार वादळी वारा सुटला. वाऱ्याच्या तीव्र तडाख्यामुळे त्यांची बोट उलटून समुद्रात बुडाली.

बोट बुडत असताना प्रकाश सारंग आणि त्यांचा मुलगा दाजी यांनी प्रसंगावधान राखत बोटीवरील ऑईल टँकरचा आधार घेत समुद्रात तरंगत राहून जीव वाचवला. दरम्यान, जवळून जाणाऱ्या दुसऱ्या मच्छीमारी होडीवरील सहकाऱ्यांच्या ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ मदतकार्य हाती घेतले. त्यांनी पिता-पुत्राला सुखरूप समुद्रातून बाहेर काढत त्यांचे प्राण वाचवले.

मात्र या दुर्घटनेत राजन सारंग हे खोल समुद्रात वाहून गेल्याने बेपत्ता झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच केरवाडी येथील मच्छीमार सोसायटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी पोलिस प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर पोलिस आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने समुद्रात युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा