You are currently viewing समुद्रात मच्छिमारी बोट उलटली; एक मच्छिमार बेपत्ता

समुद्रात मच्छिमारी बोट उलटली; एक मच्छिमार बेपत्ता

समुद्रात मच्छिमारी बोट उलटली; एक मच्छिमार बेपत्ता

शिरोडा-केरवाडी किनारपट्टीवरील दुर्घटना; पिता-पुत्राचा थरारक बचाव

वेंगुर्ला

अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे शिरोडा-केरवाडी येथील मच्छिमारीसाठी समुद्रात गेलेली बोट उलटून मोठी दुर्घटना घडली. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांपैकी दोघे जण थोडक्यात बचावले असून, एक मच्छिमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राजन सारंग (वय ४६, रा. केरवाडी) असे बेपत्ता झालेल्या मच्छिमाराचे नाव आहे.
शिरोडा-केरवाडी येथील रहिवासी आणि व्यावसायिक मच्छिमार प्रकाश सारंग, त्यांचा मुलगा दाजी सारंग आणि भाऊ राजन सारंग हे तिघे आज पहाटे नेहमीप्रमाणे मच्छिमारीसाठी समुद्रात गेले होते. मासेमारी सुरू असतानाच अचानक समुद्रात जोरदार वादळी वारे सुटले. या वाऱ्याच्या तडाख्यात त्यांची बोट समुद्रात उलटून बुडाली.
बोट बुडत असताना प्रकाश सारंग आणि दाजी सारंग यांनी प्रसंगावधान राखत बोटीवरील ऑईल टँकरचा आधार घेतला. याचवेळी जवळून जाणाऱ्या दुसऱ्या मच्छिमारी होडीवरील सहकाऱ्यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तातडीने मदतकार्य करत पिता-पुत्राला सुखरूप बाहेर काढले. त्यामुळे दोघांचे प्राण वाचले.
मात्र, या दुर्घटनेत राजन सारंग हे खोल समुद्रात बुडाले असून ते अद्याप बेपत्ता आहेत. घटनेची माहिती मिळताच केरवाडी येथील मच्छिमार सीआयटीचे चेअरमन काशिनाथ नार्वेकर यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने बेपत्ता राजन सारंग यांचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे.
या घटनेमुळे शिरोडा-केरवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून मच्छिमार बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा