पत्रादेवी येथे भरधाव कंटेनरची धडक;
मॉर्निंग वॉकला गेलेल्या ज्येष्ठाचा जागीच मृत्यू
बांदा
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सिंधुदुर्ग-गोवा राज्याच्या सीमेवरील पत्रादेवी (गोवा) येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नारायण सहदेव सावळ (वय ६४, रा. पत्रादेवी) यांचा भरधाव कंटेनरच्या धडकेत जागीच मृत्यू झाला.
उपलब्ध माहितीनुसार, नारायण सावळ हे नेहमीप्रमाणे सकाळी चालण्यासाठी पत्रादेवी महामार्ग परिसरात गेले होते. त्यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून स्थानिकांनी तात्काळ मोपा पोलिसांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मोपा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
या प्रकरणी कंटेनर चालकाविरोधात निष्काळजीपणे वाहन चालविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
