“मागेल त्याला काजू कलमे, योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी कृषी विभागाने’ मागेल त्याला काजू कलमे’ ही महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 6 हजार 400 शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. तरी पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईक नवरे यांनी केले आहे.
ही योजना सन 2026-27 या वर्षासाठी राबविण्यात येत आहे. दि. 28 एप्रिल 2026 पासून महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहेत. पात्र शेतकऱ्यांना उच्च उत्पादन देणारी काजू कलमे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या दर्जेदार काजूला देशांतर्गत तसेच जागतिक बाजारपेठेत मागणी वाढत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळविण्याची संधी निर्माण झाली आहे. यासोबतच जमिनीची धूप रोखणे आणि हरितक्षेत्र वाढविण्यासाठीही काजू लागवड उपयुक्त ठरणार आहे. या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी कमाल 50 उच्च उत्पादन देणारी काजू कलमे मोफत दिली जाणार आहेत.
एका शेतकऱ्यास किंमान 0.05 हेक्टर ( दहा कलमे ते कमाल 0.25 हेक्टर ( 50 कलमे) मर्यादित लाभ देण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर फार्मर आयडी द्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
