अंडरवॉटर म्युझियम व कृत्रिम प्रवाळ प्रकल्पामुळे साहसी पर्यटन, समुद्री संवर्धन आणि रोजगारनिर्मितीला चालना
मालवण :
सिंधुदुर्ग जिल्ह्याला केंद्र व राज्य शासनाने पर्यटन जिल्हा म्हणून मान्यता दिली असून पर्यटनवृद्धीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनाला चालना देणाऱ्या बहुउद्देशीय प्रकल्पाची गरज होती. भारतीय नौदलाची सेवामुक्त युद्धनौका ‘आयएनएस गुलदार’च्या माध्यमातून ही सुरुवात झाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा सूर्योदय होत असल्याचे मत पर्यटन व्यावसायिक महासंघ कोकणचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी व्यक्त केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती समुद्र परिसरात सेवामुक्त ‘आयएनएस गुलदार’ ही युद्धनौका समुद्रात विसर्जित करून देशातील पहिले अंडरवॉटर म्युझियम तसेच कृत्रिम प्रवाळ प्रकल्प उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जागतिक स्तरावर सेशेल्स, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांसारख्या देशांनी निवृत्त युद्धनौकांचा वापर जागतिक दर्जाच्या डायव्हिंग केंद्रांसाठी केला असून त्याच धर्तीवर सिंधुदुर्गात हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला जात आहे.
भारतीय नौदलात कार्यरत असताना ‘आयएनएस गुलदार’ने सैनिक, उपकरणे आणि आवश्यक साहित्य वाहतूक तसेच विविध समुद्री आणि किनारपट्टी संरक्षण मोहिमांमध्ये मोलाची भूमिका बजावली होती. देशसेवेतील गौरवशाली कारकीर्दीनंतर आता या युद्धनौकेचे रूपांतर समुद्राखालील पर्यटन आणि समुद्री जीवसंवर्धनाच्या केंद्रात करण्यात येत आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग किनारपट्टीजवळील निवती रॉक्स परिसरात हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा बहुउद्देशीय पर्यटन प्रकल्प साकारला जात आहे. समुद्रतळापासून सुमारे २२ मीटर खोलीवर ही युद्धनौका सुरक्षितपणे स्थापित केली जाणार असून वैज्ञानिक अभ्यासानंतर हे ठिकाण निवडण्यात आले आहे. समुद्री जैवविविधतेसाठी तसेच साहसी पर्यटनासाठी हे क्षेत्र अत्यंत उपयुक्त मानले जाते.
हा प्रकल्प केवळ पर्यटनापुरता मर्यादित नसून समुद्री पर्यावरण संवर्धन, ऐतिहासिक वारशाचा पुनर्वापर आणि साहसी पर्यटन यांचा संगम ठरणार आहे. स्कुबा डायव्हिंग, पाणबुडी पर्यटन, समुद्राखालील फोटोग्राफी, मार्गदर्शकांसह डायव्हिंग टूर तसेच समुद्र शिक्षण आणि संशोधनासाठी हा प्रकल्प मोठे आकर्षण ठरणार आहे. यामुळे सिंधुदुर्ग हे भारतातील नवे आंतरराष्ट्रीय डायव्हिंग डेस्टिनेशन म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्कुबा डायव्हिंग प्रशिक्षण, पर्यटन मार्गदर्शक, बोट सेवा, फोटोग्राफी, हॉटेल व्यवसाय आणि पर्यटनपूरक उद्योगांना यामुळे चालना मिळणार आहे. समुद्री संवर्धन, साहसी पर्यटन आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांचा अनोखा मेळ साधणारा हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या पर्यटन इतिहासातील नवा मैलाचा दगड ठरणार असल्याचे विष्णू मोंडकर यांनी सांगितले.
तसेच हा प्रकल्प निवती येथे उभा राहण्यासाठी पर्यटन विकास मंडळाचे अधिकारी, शिवसेना आमदार दीपक केसरकर, तत्कालीन पालकमंत्री, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच आवश्यक परवानग्या आणि सुविधा उपलब्ध करून देणारे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांचे पर्यटन व्यावसायिक महासंघाने आभार मानले आहेत.
