संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या हस्ते नियुक्ती; बांधकाम कामगारांच्या विविध प्रश्नांवर कुडाळ येथे सविस्तर चर्चा
कुडाळ :
कुडाळ येथे श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील बांधकाम कामगारांची सभा उत्साहात संपन्न झाली. यावेळी कामगारांनी आपल्या विविध अडीअडचणी मांडल्या. काही गावांमध्ये ग्रामसेवकांकडून आवश्यक सह्या मिळत नसल्याने कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच शिष्यवृत्ती आणि इतर योजनांचे लाभ प्रलंबित असल्याची खंतही कामगार वर्गाने व्यक्त केली.
यावर श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी कामगारांना दिलासा देत, ज्या गावांमध्ये ग्रामसेवक सह्या देत नाहीत त्या ठिकाणी कामगारांची बैठक आयोजित करावी, आपण स्वतः उपस्थित राहून ग्रामसेवकांसोबत चर्चा करू, असे सांगितले. चर्चेनंतरही सह्या देण्यास नकार दिल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच संबंधित आमदारांकडे तक्रार करून प्रश्न तातडीने सोडवला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
कामगारांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्नही लवकरच मार्गी लागणार असून संबंधित निधी कामगारांच्या खात्यात जमा होईल, अशी माहितीही प्राजक्त चव्हाण यांनी दिली.
श्रमिक कामगार संघटना तळागाळातील कामगार वर्गासाठी कार्यरत असून संघटनेचा विस्तार आणि कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी यावेळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी आत्माराम साटेलकर, जिल्हा सचिवपदी नामदेव जानकर, जिल्हा उपाध्यक्षपदी दिनेश बळी, महिला जिल्हाध्यक्षपदी अंतरा गावडे, जिल्हा सचिवपदी संजना पाटकर, कुडाळ तालुका अध्यक्षपदी दत्ताराम वारंग, कुडाळ तालुका सचिवपदी रविंद्र गुरव, दोडामार्ग तालुका अध्यक्षपदी भैरु पाटील, मालवण तालुका अध्यक्षपदी दीपक देऊलकर, कुडाळ महिला तालुका अध्यक्षपदी रसिका कदम, कुडाळ उपाध्यक्षपदी योगेश घावनळकर, कविलकट्टा प्रभाग अध्यक्षपदी प्राची पावसकर, बांबुळी प्रभाग अध्यक्षपदी दिपश्री परब तसेच कुडाळ उपाध्यक्षपदी शंकर पालकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या सर्वांना श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांनी नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सभेला रसिका चव्हाण, आरती सावंत, रश्मी भरणकर, आत्माराम सावंत, भरत परब, यशवंत जळवी, राजन ताम्हणकर, प्रकाश सावंत आणि रामदास नाईक यांची उपस्थिती होती.
यावेळी नूतन जिल्हाध्यक्ष आत्माराम साटेलकर आणि महिला जिल्हाध्यक्ष अंतरा गावडे यांनी कामगारांच्या प्रश्नांसाठी संघटना सदैव त्यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास व्यक्त केला. तळागाळातील कामगारांना एकत्र करून संघटना अधिक भक्कम करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
सभेच्या शेवटी श्रमिक बांधकाम कामगार संघटना कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच अग्रेसर राहून ते सोडवित असल्याचे गौरवोद्गार उपस्थित कामगारांनी काढले.
