You are currently viewing माणूस..

माणूस..

 

अनंत स्वरूप परमेश्वराने जी अनंत निर्मिती केली. त्यात माणूस या प्राण्याची निर्मिती म्हणजे त्या परमेश्वराची एक विलक्षण कलाकृती होय. सर्वच दृष्टीने माणूस हा प्राणी परमेश्वराच्या इतर सर्व निर्मितीपेक्षा वेगळा व आगळा असा आहे. माणसाची अंतर्बाही रचना जशी विलक्षण आहे त्याहीपेक्षा माणसाला लाभलेला मेंदू हा मोठा विलक्षण आहे. माणसाला लाभलेल्या मेंदूच्या बळावर माणसाने जवळ जवळ पतिसृष्टी निर्माण करण्याचे आव्हान विधात्याला दिलेले आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट अशी की मेदूचा असा वापर करून प्रगती साधणाऱ्या माणसाने ह्या मेंदूचा केवळ जास्तीत जास्त दहा टक्केच भाग वापरला आहे. भविष्य काळात जर माणसाने मेदूचा १००% भाग वापरात आणला तर या विश्वाची परिस्थिती काय होईल याची कल्पना सुद्धा करता येणार नाही. त्याचप्रमाणे मेंदूचा दुरूपयोग करून माणूस सर्वनाश कधी ओढवून घेईल हे सुद्धा सांगता येणे कठीण आहे. म्हणून मानवी मेंदूचे वरदान प्राप्त झालेल्या माणसाने त्या मेंदूचा जास्तीत जास्त सदुपयोग करून या विश्वाचे कल्याण साधणे सर्वांच्याच दृष्टीने हितावह ठरेल.

 

🎯 भावनाप्रधान माणसे पराचा कावळा करून काव काव करतात व स्वतःला व इतरांना कातावून सोडतात.

 

🎯 माणूस म्हटला की तो चुकायचाच परंतु त्या चुकीचा खिळा करून जीवनच खिळखिळे करून सोडणे हे आहे अमानुष.

 

🎯 बोलण्यात ताळतंत्र नाही व खाण्यापिण्यात धरबंध नाही असा बेताल व बेअकली माणूस स्वतःच्या व इतरांच्या दुःखाला कारणीभूत ठरतो.

 

🎯 निसर्गाला जिंकण्याच्या बढाया मानव सदैव मारीत असतो, परंतु तो हे विसरतो की माणूस हा सुद्धा निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे.

 

🎯 सुख व समृद्धी निर्माण करणारा देव तर दुःख व टंचाई निर्माण करणारा माणूस. देवापेक्षा माणूस ‘श्रेष्ठ’ आहे तो असा.

 

🎯 इतरांना लाथा व बायकोला माथा असा ज्याचा खाक्या तो बाईलोबा.

 

🎯 कर्मठ माणसे एका बाजूने उर्मट बनतात तर दुसऱ्या बाजूने मठ्ठ होतात.

 

🎯 ज्या माणसांना माणसांची किंमत कळत नाही, त्या माणसांना माणसे म्हणण्यापेक्षा दोन पायांचे पशू म्हणावेत.

 

🎯 गत गोष्टींपासून जो धडा शिकत नाही तो गधडा.

 

🎯 म्हातारपणी मनुष्य परमार्थच काय पण अन्य काहीही करू शकत नाही; नाही म्हणावयास त्याला फक्त एकच गोष्ट करणे शक्य असते व ती म्हणजे केवळ ‘भोग भोगणे’ ही होय.

 

🎯 नराचा नारायण किंवा नराचा वानर होणे सर्वस्वी माणसाच्याच हाती आहे.

 

🎯 अडाणी माणसे ‘सर्वस्वाचा त्याग’ याचा शब्दश: अर्थ करतात व शेवटी अनर्थ प्राप्त करून घेतात.

 

🎯 माणूस असला तरी माणसांत माणुसकी असते असे नाही. त्याप्रमाणे ईश्वर सर्वत्र असला तरी ईश्वरत्व सर्व ठिकाणी असते असे नाही.

 

🎯 माणसाचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे गैरसमज.

 

🎯 सज्जन माणसे लोकांच्या ‘नादी’ लागून स्वतःला त्रासात टाकून घेतात तर दुर्जन माणसे लोकांना आपल्या नादी लावून स्वतःची तुंबडी भरून घेतात.

 

🎯 परमेश्वर एक पायरी उतरला व तो झाला माणूस माणूस स्वतःला विसरला आणि तो झाला पशू.

 

🎯 सांगून लोक सुधारले असते तर साक्षात् स्वर्गच पृथ्वीवर अवतीर्ण झाला असता.

 

🎯 दोष पहाणारे ते डोमकावळे, तर गुण पहाणारे ते राजहंस.

 

🎯 माणसांत जंत, पंत व संत असे तीन प्रकार असतात. विषय सुखासाठी वळवळणारे ते जंत, शब्दज्ञानात रमणारे ते पंत व नामात रंगणारे ते संत.

 

🎯 “मी कधीच चुकत नाही” असे ज्याला वाटते तो कधीच सुधारणे शक्य नाही.

 

🎯 सर्वसामान्य माणसांची अवस्था अशी आहे की ते ‘राम’ म्हणेपर्यंत राम म्हणत नाहीत व एकदा का ‘राम’ म्हटले की मग राम म्हणण्याची सोय नाही.

 

🎯 माणूस ‘ताठ’ झाल्यावर त्याची जेथे सोय केली जाते त्याला ताटी असे म्हणतात.

 

🎯 “परमेश्वर एक आहे,मानव जात एक आहे, मानवी मन एक आहे,मानवी संस्कृती एक आहे”, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्वमानवाच्या विश्वशांतीचे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्यात मानवजातीचे कल्याण आहे.

 

🎯 “जग सुखी तर आपण सुखी व जग दुःखी तर आपण दु:खी”, अशी जाणीव माणसांच्या बुद्धीत वैज्ञानिक दृष्टीकोनातून निर्माण केल्याशिवाय जगात खरी क्रांती होणार नाही.

 

🎯 छोटी माणसे गोठ्यांना नेहमीच हसत असतात, कारण दात विचकून हसण्यापलीकडे अन्य काही करण्याची कुवतच त्यांच्यात नसते.

 

🎯 प्रेमाच्या डोळ्यांना फक्त गुण दिसतात व दोष दिसून दिसत नाहीत, परंतु द्वेषाने आंधळ्या झालेल्या डोळ्यांना फक्त दोष दिसतात व गुण असून दिसत नाहीत.

 

🎯 माणूस हा विचार करणारा प्राणी आहे असे म्हणण्यापेक्षा ‘विचार करतो तो माणूस’ असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल.

 

🎯 महत्त्वाकांक्षी माणसे स्वतःचे भले करण्याच्या प्रयत्नांत प्रायः स्वतःसंकट सर्वांचेच वाटोळे करून बसतात.

 

🎯 माणसाच्या सर्व समस्या सहज सुटून तो सुखशांतीच्या नंदनवनात नित्य वास करीत राहील, जर मानवजातीने ‘अखिल मानवजातीचे हित लक्षात घेऊन माणसाच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला तर, अन्यथा इतिहासाची पुनरावृत्ती अनंत काळपर्यंत होतच राहील.

 

🎯 जेव्हा माणूस निसर्गाला जिंकण्याच्या कल्पना करतो व बढ़ाया मारती तेव्हा सर्वशक्तीमान सर्वेश्वर गालांतल्या गालात मिष्किलपणे हसत असतो.

 

🎯 माणसासारखा दिसतो म्हणून त्याला माणूस म्हणता येणार नाही. विचार करतो तो माणूस,वाचन करतो तो माणूस माणसासारखा वागतो तो माणूस.

 

🎯 “देवाचे दिव्यत्त्व, धर्माची व अविचारी लोकांचा सुळसुळाट हेच या जगाचे खरे दुर्दैव होय.

 

🎯 अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व वैद्यकीय मदत या सुविधा न मिळण्यात माणसाचे खरे दुःख भरलेले आहे.या व्यतिरिक्त बाकीची सर्व दुःखे मानवनिर्मित असतात.

 

🎯 ‘आपले हित कशात आहे याचे सुद्धा माणसाला ज्ञान नसते, एवढे माणसाचे अज्ञान प्रचंड असते. परंतु सर्वात कमाल म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी तरी आपण इतरांशी सौजन्याने वागले पाहिजे, याचेसुद्धा त्याला ज्ञान नसते.

 

🎯 विचार व विकार, संकल्प व विकल्प, कल्पना व भावना अशा तऱ्हेचे रंगी-बेरंगी धागे आपण आपल्यातूनच निर्माण करून बहिर्मन व अंतर्मन या उभ्या आडव्या टाक्यांनी हे संसाराचे जाळे विणण्याचे काम करीत असतो. स्वतःनिर्माण केलेल्या जाळ्यात जे रेशमी किड्यासारखे स्वतःच अडकतात ते बद्ध तर याच्या उलट जे या जाळ्यात कोळ्यासारखे सुखाने विहार व व्यवहार करतात ते सिद्ध किंवा मुक्त जाणावेत.

 

🎯 ज्ञानदान करून व अनेक लोकांना अचूक मार्गदर्शन करून त्यांना त्यांच्या कल्याणाचा मार्ग दाखविणारे विचारवंत हे खरोखरीच समाजाचे भूषण होत. त्याचप्रमाणे नामस्मरण स्वतःकरून इतरांना नामस्मरण करण्यास प्रवृत्त करणारी माणसे समाज पुरुषाचे अलंकार होत.

 

🎯 पूर्वकृत पाप-पुण्याची पुंजी, जन्मानंतर त्याच्यावर होणारे बरे-वाईट संस्कार व त्याच्या हातून घडणारी बरी-वाईट कर्मे, यांच्या मीलनांतून माणसाला खऱ्या अर्थाने “खरा नव जन्म ” प्राप्त होऊन त्याचे पुढील भवितव्य उभारले जाते.

 

*🙏सद्गुरू श्री वामनराव पै*🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − three =