You are currently viewing करूळ जामदारवाडी धरणात दुर्दैवी घटना

करूळ जामदारवाडी धरणात दुर्दैवी घटना

करूळ जामदारवाडी धरणात दुर्दैवी घटना; तीन शाळकरी मुलींचा बुडून मृत्यू

अंघोळीसाठी गेलेल्या सहा जणांपैकी तिघींचा जीव गेला; करूळ गावावर शोककळा

वैभववाडी / प्रतिनिधी :

करूळ जामदारवाडी येथील धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे करूळ परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावावर शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत तन्वी अनंत माळकर (वय १६, रा. करूळ), स्वरा संदीप सुर्वे (वय ११, रा. कुसूर) आणि ऋतिका संतोष पाटील (वय १४, रा. करूळ) यांचा मृत्यू झाला. स्वरा ही मामाच्या गावी आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, चार तरुणी आणि दोन तरुण असे एकूण सहाजण करूळ जामदारवाडी धरणात अंघोळीसाठी गेले होते. यावेळी पोहण्याचा मोह आवरता न आल्याने काही जण पाण्याच्या खोल भागात गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने तन्वी, स्वरा आणि ऋतिका या तिघी पाण्यात बुडाल्या.
बराच वेळ त्या दिसून न आल्याने सोबत असलेल्या मित्रमैत्रिणींनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी तिघी बुडाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. गावातील नागरिकांनी तातडीने धरणाकडे धाव घेत तिघींना बाहेर काढले. मात्र, त्यांना वाचविण्याचे प्रयत्न अपयशी ठरले.
घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली असून या दुर्घटनेने संपूर्ण करूळ गाव हादरून गेले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा