रश्मी मोघेंच्या सुरांनी रंगणार सावंतवाडीतील ‘स्वरोत्सव’
शास्त्रीय, उपशास्त्रीय आणि नाट्यसंगीताची सुरेल मैफल १७ मे रोजी गोविंद चित्रमंदिर येथे
सावंतवाडी :
“सुरश्री संगीत ग्रुप सावंतवाडी” यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘स्वरोत्सव’ या विशेष संगीत मैफलीत पुण्याच्या सुप्रसिद्ध गायिका रश्मी मोघे आपल्या सुरेल गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. रविवार, दि. १७ मे २०२६ रोजी सायंकाळी ५.०० ते ७.३० या वेळेत गोविंद चित्रमंदिर, सावंतवाडी येथे ही मैफल रंगणार आहे.
सुरश्री संगीत ग्रुपतर्फे गेल्या वर्षभरात विविध संगीत कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमांना सावंतवाडीसह बाहेरील संगीत रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. याच प्रतिसादातून ‘स्वरोत्सव’ या अभिजात संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात रश्मी मोघे यांना तबल्यावर सावंतवाडीचे युवा कलाकार नीरज भोसले, हार्मोनियमवर मंगेश मेस्त्री तसेच पखवाजावर मनीष तांबोसकर साथसंगत करणार आहेत. शास्त्रीय, उपशास्त्रीय तसेच भावपूर्ण नाट्यसंगीताच्या विविध रंगांनी सजलेली ही मैफल संगीतप्रेमींसाठी खास पर्वणी ठरणार आहे.
संगीत रसिकांनी या सुरेल मैफलीला उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजक “सुरश्री संगीत ग्रुप सावंतवाडी” यांच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रवेशिका व अधिक माहितीसाठी मंजिरी सचिन धोपेश्वरकर यांच्याशी ८७६६६९८८५४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
