सिंधुदुर्ग :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (MSBSHSE) इयत्ता दहावी (SSC) परीक्षेचा निकाल शुक्रवार, ८ मे २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजल्यापासून अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली आहे.
निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांना आपला निकाल mahahsscboard.in तसेच sscresult.mkcl.org या संकेतस्थळांवर पाहता येणार आहे.
यंदाची दहावीची परीक्षा दिनांक २० फेब्रुवारी ते दी १८ मार्च २०२६ या कालावधीत राज्यभरातील ५,१११ परीक्षा केंद्रांवर पार पडली होती. परीक्षेसाठी एकूण १६ लाख १५ हजार ४८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यामध्ये ८ लाख ६५ हजार ७४० विद्यार्थी, ७ लाख ४९ हजार ७३६ विद्यार्थिनी तसेच १३ तृतीयपंथीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
राज्यातील २३ हजार ६८३ शाळांमधून विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून, गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा ३८७१ विद्यार्थ्यांची वाढ झाल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.
