You are currently viewing स्पर्श

स्पर्श

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा श्रीशब्द लालित्य समूहाच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.मंजिरी अनसिंगकर लिखित अप्रतिम लेख*

 

*……स्पर्श*

 

स्पर्श–एक संवेदना..स्पर्श– मनातील व्यक्त होणारी भावना..स्पर्श..एक सुखद सुंदर अनुभूती..स्पर्श–प्रेम मायेची अभिव्यक्ती..स्पर्श—जीवन संजीवनी..स्पर्श— तन मन आनंद भुवनी….

परमेश्वराने मानवाला जी पांच ज्ञानेंद्रिये दिली आहेत, त्यातीलच एक त्वचा! जिच्यामुळे स्पर्श संवेदना जाणवते.. समजते. या संवेदनेला मानवी जीवनात खूप महत्त्व आहे. स्पर्शसुख म्हणजे काय नि ते किती महत्त्वाचे आहे,हे स्पर्शा पासून वंचित असलेल्यांना विचारा, म्हणजे त्याची किंमत कळेल.

जीवनात मागे वळून पाहिले कि,जीवनाच्या विवीध टप्प्यातील स्पर्शसुखाची गाथा ,रेशीम लड हळूवारपणे उलगडत जावी, तशी मनात. उलगडत जाते..मनात रुंजी घालते ..गुणगुणते..हिंदोळ्यावर झुलावे ,तशा आठवणी मनाला झुलवत रहातात. टपो-या मोत्यांच्या माळेतील मणी एकामागोमाग एक घरंगळावे,तशा आठवणी मन गाभाऱ्यात घरंगळत येतात. नि त्या त्या स्पर्शाच्या अनुभूतीचा पुन: प्रत्यय देतात. .

जीवनातल्या वेगवेगळ्या टप्प्यात, स्पर्शाचा अर्थ वेगवेगळा होत जातो. तसे त्याचे वेगवेगळे प्रकारही अनुभवास येतात.सहेतुक..निर्हेतुक.बोचरा.. मुलायम..मखमली..जादुई… आनंदमयी.. प्रेममयी तर कधी वेदनामयीही!

अगदी लहान बाळाला जेव्हा त्याचे आईबाबा पटकन उचलून त्याची पापी घेतात..त्याला गोल गोल फिरवतात तेव्हा त्या लहानग्याला किती आनंद होतो हे त्याच्या चेहऱ्यावर लगेचच दिसते.तो मायेचा..लाडाचा स्पर्श त्याला सुखावतो.खोटे खोटे रागावून गालाला हात लावला तर तो रागावण्याचा स्पर्शही त्याला कळतो. नि ते बाळ रडवेले होते. हो न! आपणही या अर्भकावस्थेतून गेलेलो आहोत.तो स्पर्श.. ती अनूभूती .,आता आठवत नाही इतकेच! त्याला नुसते थोपटले तरी त्या आश्वासक स्पर्शातून आपण एकटे नाही हे त्याला उमगते.स्पर्शाची ही भाषा किती छान न!

पुढे शाळेत जातांना आई जवळ घेते…पापी घेते तो स्पर्श धीर देण्याचा! चांगले मार्क्स मिळाले.. स्पर्धेत बक्षीस मिळाले कि बाबांची पाठ थोपटून शाबासकी..आईचा कौतुकाचा स्पर्श..आनंद..प्रोत्साहन देऊन जातो. मैत्रिणीची गळाभेट वेडावून जाते. हे सगळे स्पर्श सुखानूभूती देतात. मैत्रिणीचे हातावर टाळी देणे.. हातमिळवणी करणे…गळ्यात पडून रडणे.. या सगळ्या स्पर्शातून वेगवेगळ्या भावनांचा आविष्कार होतो. नि मैत्री घट्ट होत जाते. कट्टीची बट्टी करतानाचा स्पर्श… पश्चात्ताप..माफी नि जवळीकही सांगून जातो.

यौवनात.. ही सुंदरा..

जग भासे मनोहरा

फुलपांखरी लागे जीवन

आनंदाने नाचे तनमन.

 

हे वयच असे वेगळे.आनंदी..उत्साही…उर्जामयी! करिअर करण्याचे हे वय!पण प्रेमात पडण्याचेही हेच वय, बरं का!अनवधाने जरीही मित्राचा स्पर्श झाला तर,गोरेमोरे होण्याचे हेच वय! कुणी, विशेषत:,मित्राने स्तुती केल्यास, गाली गुलाब फुलण्याचे हे वय! प्रेमात पडून त्यात आकंठ बुडण्याचे हे वय! स्वप्नाळू होऊन ,स्वप्न नगरीत..प्रेम नगरीत भटकण्याचे हे वय! या वयाचे ..तारूण्याचे कवी..लेखकांनी नेहमीच सुंदर वर्णन केले आहे.चित्रपटातूनही. याच तारूण्याचे चित्रण केले जाते.

प्रेमात पडणे ही सहज गोष्ट आहे. निसर्ग धर्माला धरून आहे. प्रियकराच्या जादुई स्पर्शाने,”आज मै ऊपर..आसमा निचे”” अशी अवस्था झाल्यास नवल ते काय!

त्याच्याशीच लग्न झाले तर, नि आजकाल ती होतातच,तो फिर क्या कहने! त्याचा तो धुंद फुंद करणारा स्पर्श! तनमन मोहरून टाकतो तो स्पर्श! रोम रोम शहारतो त्या स्पर्शाने! जादुईच स्पर्श तो!जीवनात मोठा बदल घडविणारा.. स्वप्नात रमविणारा.. चांदण्यांची बरसात करणारा. जीवनात .इंद्रधनुच्या सप्तरंगांची उधळण करणारा.. गोड गुलाबी स्पर्श!लग्नात सप्तपदी चालतांना हातात हात घेतल्यानंतरचा आश्वासक स्पर्श..सुखी जीवनाची नांदी करणारा असतो.

आई झाल्यावर होणारा बाळाचा मृदु..मुलायम..मखमली स्पर्श.. शरीराचा कण नि कण आनंदाने फुलवून टाकतो. बाळाचा तो स्पर्श .सगळ्या वेदना..सगळे जग विसरायला लावतो.त्याचे वर्णन शब्दातीत असते. शाळेत जाणारे अपत्य..मुलगा असो वा मुलगी जेव्हा my mom is the best mom म्हणत जेव्हा त्यांचे हात गळ्यात पडतात न!तेव्हा सुख म्हणजे नक्की काय असतं ,ते समजतं.

जीवन असं पुढे सरकत असतांना ,अगणित स्पर्श होत असतात. कधी सुखावणारे तर कधी दुखावणारे! कधी आधार देणारे तर कधी नुकसान करणारे! पण हे सगळं मागे टाकत पुढे चालत जावेच लागते.

आपल्याकडे सणवार हे ऋतुमानाशी..निसर्गाशी निगडित आहेत तसेच त्यांची नाळ स्पर्श या संवेदनेशीही जुळलेली आहे. ही नाळ माणसाला सुखाने ..आनंदाने जगण्यासाठी पोषक रस पुरवते.

दिवाळीत भाऊबीज साजरी करतांना वा राखीला होणारे बहीण भावाचे खट्याळ स्पर्श, त्यांच्या नात्यातील प्रेम..गोडवा दर्शविते. एकमेकांच्या खोड्या करतांना होणारे स्पर्श, बहीण भावाच्या नात्याची वीण घट्ट करतात. तुझे माझे पटेना..तुझ्यावाचून करमेना अशी स्थिती त्यांच्यातील माया..लळा अधोरेखित करते.

दसरा ..दिवाळीच्या पाडव्याला बायको जेव्हा नव-याला ओवाळते, गंध लावते तेव्हा, त्या स्पर्शातून माधुर्य..गोडवा त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतो. त्या स्पर्शात असते ओढ..प्रेम..विश्वास..एकमेकांविषयीचा आदर!दीर भावजयीचेही नातेकेव्हा बहीण भावाच्या नात्यात बदलते समजतही नाही. सासरी भाऊ मिळाल्याचा आनंद मनास प्रफुल्लित करू जातो.

सणावाराला आपण आवर्जून घरातील वडिलधा-यांना.. आई वडिलांच्या पायाला हात लावून नमस्कार करतो तो चरणस्पर्श! तो एक वेगळीच अनुभूती देऊन जातो. आईवडिलांचा हस्तस्पर्श डोक्याला होताच एक ठाम आधाराची अनुभूती होते, जी जीवन आश्वस्त करते. सद्गुरुंचा चरणस्पर्श करायला मिळणे खरंच भाग्याचेच म्हणावे लागेल. त्या स्पर्शातून जी संवेदना होते ना, त्याचे वर्णन करता येणार नाही. रोमारोमात एक विजेचा लोळ लखलखून जातो… देहभान विसरायला लावतो…अवर्णनीय संवेदना!अष्टादश भाव ..अनन्य भाव..शरणागत भाव उचंबळून येतात. मन सद्गतीत होते. सद्गुरू आपल्या पाठीशी आहेत..ही भावना कृतकृत्य करणारी असते.

 

प्रत्येक जातीधर्मात वेगवेगळे सण असले तरी स्पर्शाचा प्रकार एकच..आपुलकीचा..प्रेमाचा..मायेचा.. आधाराचा!

जीवनाची संध्याकाळ होताच, स्पर्शाची खरी किंमत कळते. मुलं..मुली आपआपल्या संसारात.. नोकरीत..व्यवसायात रमून गेलेली असतात.नातवंड अभ्यासात..शिक्षणांत बुडालेली असतात तेव्हा एकटेपणा जाणवतो. हल्ली म्हातारी माणसं स्पर्शसुखाला पारखी झालीत हो!कुणालाच त्यांच्यापाशी बसायला..बोलायला वेळ नाही,तर स्पर्शाची गोष्टच सोडा. स्पर्शसुखासाठी ती आसुसलेली असतात, पण तरूणांच्या हे लक्षातच येत नाही.अपवाद असू शकतात.

आमच्या शेजारच्या आजी त्यांची मुलगी..वा नात माहेरी आली की, तिला हक्काने जवळ बसवायच्या.तिच्याचेह-यावरून हात फिरवायच्या..तिचा हात हातात घ्यायच्या. तीही आजीच्या कुशीत शिरली की त्यांच्या सुरकुतल्या चेह-यावर एक वेगळाच..तृप्तीचा आनंद दिसायचा.ते का,हे आज उमगतय! एक हलकासा मायेचा स्पर्श म्हाता-या माणसाला किती सुखावून जातो न! असो, कालाय तस्मै नम:!

एकंदरीतच मानवी जीवनात स्पर्शाला खूप महत्त्व आहे. दृष्टी हीनांना तर विशेषच!सर्व प्रकारच्या भावना त्यांना स्पर्शातून उमगतात.

म्हणूनच आपल्या माणसांना हे स्पर्शसुख द्या. कितीही व्यस्त दिनक्रम असला तरी त्यांच्यासाठी वेळ काढा. तुमच्या हलक्याशा स्पर्शाने जीवलगांना जगण्याची उभारी मिळेल.. आनंद मिळेल. .समाधान मिळेल. .

स्पर्शाचे हे सुख जीवनात हरवू देऊ नका.एवढेच सांगणे हो!

 

सौ. मंजिरी अनसिंगकर नागपूर.

मो.नंतर.7020757854.

प्रतिक्रिया व्यक्त करा