मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; कर्करोग निदान अधिक जलद व अचूक होणार
सिंधुदुर्गनगरी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवेला मोठी चालना देणारी अत्याधुनिक हिस्टोपॅथोलॉजी प्रयोगशाळा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरू करण्यात आली. जिल्हा नियोजन समिती अंतर्गत निधीतून उभारण्यात आलेल्या या प्रयोगशाळेचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमाला आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, अधिष्ठाता डॉ. अनंत डवंगे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व स्थानिक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवीन सुरू झालेल्या या प्रयोगशाळेमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचे निदान आता जिल्ह्यातच अधिक जलद आणि अचूक पद्धतीने करता येणार आहे. यामुळे रुग्णांना मोठ्या शहरात जाण्याची गरज कमी होणार असून वेळ व खर्चाची बचत होणार आहे.
या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम, आधुनिक आणि रुग्णाभिमुख होणार असून ग्रामीण भागातील नागरिकांनाही उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
