You are currently viewing नीता सातपुते ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित

नीता सातपुते ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित

*नीता सातपुते ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित*

पिंपरी

कामगार साहित्यिक श्रमश्री बाजीराव सातपुते यांच्या सहचारिणी नीता सातपुते यांना गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी ऑटोक्लस्टर सभागृह, सायन्स पार्कसमोर, चिंचवड येथे ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले; तर उद्योजक भगवान पठारे यांना पद्मश्री नारायण सुर्वे कृषी – उद्योग जीवनगौरव सन्मान प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर प्राचार्य शंकर देवरे (पद्मश्री नारायण सुर्वे भला माणूस सन्मान), अरुण गराडे (पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी सन्मान), संगीता झिंजुरके (पद्मश्री नारायण सुर्वे काव्यप्रतिभा पुरस्कार) तसेच डॉ. स्वाती पाटील आणि नीलेश शेंबेकर यांना (पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले. मराठी विश्वकोश मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते तसेच टाटा मोटर्सचे निवृत्त महाव्यवस्थापक मनोहर पारळकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय कामगारदिन, महाराष्ट्र राज्य स्थापनादिन आणि कविवर्य नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने चौतिसावी श्रम – उद्योग परिषद आणि उपेक्षित कष्टकरी यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मितेश डूळगज (शवविच्छेदक मजूर), प्रशांत बराटे (स्मशानभूमी सेवक), कल्पना कदम (मोलकरीण), मनोजकुमार राम (पीठगिरणी मजूर) आणि प्रवीण बागूल (सफाई मजूर) या उपेक्षित कष्टकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी, ‘समाजात शारीरिक श्रमाला दुय्यम स्थान देण्यात येते. या पार्श्‍वभूमीवर उपेक्षित कष्टकऱ्यांचा सन्मान मोलाचा वाटतो!’ आणि मनोहर पारळकर यांनी, ‘कामगार, महिला आणि उपेक्षित कष्टकरी यांच्यामुळे समाजचक्र सुरळीत चालते!’ असे विचार व्यक्त केले. सत्काराला उत्तर देताना नीता सातपुते यांनी, ‘विनाशुल्क योग प्रशिक्षण आणि अडीअडचणींमध्ये निरपेक्ष आधार देऊन महिला भगिनींना सक्षम करण्यात मनापासून आनंद मिळतो!’ तसेच भगवान पठारे यांनी, ‘वेदना आणि विश्वास यांवर मानवी जीवन आधारित असल्याने कृषी प्रकल्पाच्या माध्यमातून ते सुखदायक होण्यासाठी अथकपणे प्रयत्नशील आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या. पुरुषोत्तम सदाफुले यांनी पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या.

कामगारभूषण राजेंद्र वाघ यांनी सादर केलेल्या कविवर्य नारायण सुर्वे यांच्या ‘डोंगरी शेत माझं…’ या कवितेने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. सुदाम भोरे यांनी प्रास्ताविकातून सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून हा सातवा कार्यक्रम आहे, अशी माहिती दिली. संगीता झिंजुरके, जयश्री श्रीखंडे, प्रतिमा काळे, कुमार खोंद्रे या कवींनी काव्यजागर केला. शारदा मुंडे, राजेंद्र घावटे, राधाबाई वाघमारे यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. डॉ. राजा दीक्षित यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘नारायण सुर्वे म्हणजे मराठीला काव्याचा शेला बहाल करणारा
कबीराच्या पंथातील श्रेष्ठ कवी होय!’ असे मत मांडले. इंद्रजित पाटोळे, प्रभाकर वाघोले, जयवंत भोसले, राजू जाधव, स्वाती भोसले, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा