*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*
*१मे– आंतरराष्ट्रीय कामगार दिन*
१ मे हा दिवस “जागतिक कामगार दिन” आणि “महराष्ट्र दिन” म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिनाचे फार मोठे महत्व आहे. या दिवशी कामगार वर्गाला मालकशाही
कडून मिळणारी शोषणातून आणि पिळवणूकीतून मुक्ती मिळाली. तसेच याच दिवशी म्हणजे १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली म्हणून “महाराष्ट्र दिन” ही या दिवशी साजरा केला जातो. या दिनाचा इतिहास ही खूप जुना आणि रक्त रंजित आहे…
१ मे हा दिवस कामगारांच्या आयुष्यातील महत्वाचा दिवस. हा दिवस कामगारांच्या आयुष्यात नवीन पहाट घेऊन आला आणि अनेक काळापासून भांडवलशाही आणि साम्राज्यवादी व्यवस्थेला त्रासून गेलेला हा कामगार वर्ग या नरकातून मुक्त झाला.. हा दिवस जगात ८० देशात साजरा केला जातो. या दिवशी कायद्याने कामगार वर्गाला सुट्टी दिली जाते.. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. विविध स्तरावरील कामगार, कामगार संघटना, उद्योजक, एकत्र येऊन या दिवसांची स्मृती आठवून ज्या ज्या लोकांनी या चळवळीमध्ये आपले बलिदान दिले त्यांना अभिवादन करून उत्कृष्ट काम करणाऱ्या कामगारांना या दिवशी गौरविण्यात येते…
कामगारांच्या हक्कासाठी उभारलेल्या लढ्यामुळे जगभरात एक नवी क्रांतीच सुरू झाली..उद्योगात बारा तासांहून अधिक काळ राबवणाऱ्या कामगारांसाठी हा लढा सुरू झाला आणि या लढ्यात मिळालेल्या यशाचं प्रतीक म्हणून जगभरात एक मे हा दिवस “आंतरराष्ट्रीय कामगार दिन’” म्हणून साजरा केला जातो..
कामगार दिन सुरु करण्यामागे मुख्य कारण होते ते म्हणजे कामगारांना मालकशाहीच्या शोषणातून आणि पिळवणूकीतून मुक्ती देणे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कामगारांची आवश्यकता भासू लागली आणि त्या प्रकारे कामगारांना भरती ही केले गेले. परंतु या मागे मालकशाहीचा फार मोठा स्वार्थ होता. नफ्याच्या नादात मालक वर्ग कामगारांकडून प्रमाणापेक्षा काम करवून घेवू लागले. दिवसातील बारा ते चौदा तास
त्यांच्याकडून राबवून घेतले जात होते. काम करवून घेत होते परंतु त्यांना तसा मोबदलाही ते देत नव्हते व देण्यास तयारही नव्हते.. आवश्यक त्या सुविधांपासून कामगार वर्गाला वंचित ठेवले गेले होते. त्यांचे मानसिक शोषण केले जाते होते. या सर्वातून मुक्ती मिळावी म्हणून कामगार वर्गाने उद्योजकांकडे आठ तासांचा कामाच्या वेळेसाठी ठराव करण्याचा प्रस्ताव ठेवला परंतु उद्योजक त्यांना जुमानत नसल्यामुळे आंदोलने करण्यात आली. यात कामगार संघटनेंची दोन आंतरराष्ट्रीय अधिवेशने झाली आणि या मधून १८९१ पासून १ मे हा कामगार दिन म्हणून घोषित केला गेला आणि तो कायदेशीररित्या पाळण्यात आला.
देशाच्या पर्यायाने जगाच्या विकासात कामगारांच्या योगदानाला सलाम करण्यासाठी १ मे हा दिवस जगभरात कामगारदिन म्हणून पाळला जातो..
आजचा दिवस हा या सर्व कामगारांच्या समर्पण आणि मेहनतीचा सन्मान करण्याचा दिवस आहे. हे सर्व कामगार समृद्ध भारताचा पाया रचत असून देश उभारणीच्या कामातले तेच खरे शिल्पकार… !!
महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून दोन्ही दिवसांना तितकेच महत्त्व आहे.
लेखिका/ कवयित्री
संगीता कुलकर्णी– ठाणे@
9870451020
