देवगडमध्ये सर्पमित्राला सापाचा दंश; उपचारासाठी जाताना कार अपघात
एकाच वेळी दोन संकटांचा सामना; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
देवगड :
तालुक्यातील आरा येथे साप पकडताना एका सर्पमित्राला सापाने दंश केल्याची घटना घडली. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली.
राजेंद्र पंढरीनाथ पारकर (वय ६४) असे जखमी सर्पमित्राचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारकर हे आरा येथे साप पकडण्यासाठी गेले असता सापाने त्यांच्या हाताला दंश केला. त्यानंतर त्यांनी तातडीने स्वतःच्या सुमो गाडीतून शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडे उपचारासाठी प्रस्थान केले.
या वेळी त्यांच्या सोबत पत्नी व अन्य दोन जण गाडीत होते. मात्र, शिरगावकडे जात असताना समोरून येणाऱ्या रिक्षा आणि बोलेरो वाहनाला त्यांच्या सुमोची धडक बसली. या अपघातात रिक्षाचालक जखमी झाला असून तिन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.
अपघातानंतर पारकर यांना तातडीने शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती लक्षात घेता पुढील उपचारांसाठी त्यांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सर्पदंश आणि त्यानंतर अपघात अशा दुहेरी संकटाला पारकर यांना सामोरे जावे लागल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुढील तपास व कार्यवाही सुरू आहे.
