माजगाव सरपंचपदी रंजना कानसे विजयी; १५८ मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव
कमी मतदानातही भाजप-शिवसेना महायुतीचा गड कायम; नाणोस पोटनिवडणुकीतही महायुतीचा विजय
सावंतवाडी
माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार रंजना रवींद्र कानसे यांनी १५८ मतांनी विजय मिळवत सरपंचपदावर आपली मोहोर उमटवली. त्यांनी अपक्ष उमेदवार जयश्री दिनेश सावंत यांचा पराभव केला. या विजयामुळे माजगावचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांचा प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
या निवडणुकीत रंजना कानसे यांना ८८२ मते मिळाली, तर जयश्री सावंत यांना ७२४ मते मिळाली. एकूण ४१८५ मतदारांपैकी केवळ १६७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची टक्केवारी ४०.११ इतकी राहिली. कमी मतदानाचा फटका कोणाला बसणार याबाबत चर्चा रंगली होती, मात्र महायुतीने आपला गड कायम राखण्यात यश मिळवले.
निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच या लढतीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले होते. महायुतीने ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती, तर अपक्ष उमेदवार जयश्री सावंत यांनीही जोरदार लढत दिली. मात्र मतमोजणीत रंजना कानसे यांनी सातत्यपूर्ण आघाडी घेत विजय खेचून आणला.
विजयाची घोषणा होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित सरपंच रंजना कानसे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
विजयानंतर ग्रामपंचायत कार्यालयात कार्यभार स्वीकारताना भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत यांनी त्यांचे अभिनंदन केले. पंचायत समिती सदस्य महेश धुरी, माजी उपसरपंच संजय कानसे, मधुकर देसाई, शाम कासार, बाळा वेजरे आदी उपस्थित होते.
दरम्यान, तालुक्यातील नाणोस ग्रामपंचायत सदस्य पदाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे रवींद्र जोशी हे ५८ मतांनी विजयी झाले. या दोन्ही विजयामुळे तालुक्यात महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
