ग्रामीण विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार; संपूर्ण शैक्षणिक वर्षभर उपक्रम सुरू राहणार
पडेल (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देत त्यांना करिअरच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी पडेल ग्रामपंचायतीने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. येथील श्रीराम माध्यमिक विद्यामंदिर, पडेल येथे ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन’ आणि ‘नृत्य प्रशिक्षण’ कार्यशाळेचा नुकताच उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
या उद्घाटन सोहळ्यास गावचे सरपंच भुषण पोकळे अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपसरपंच विश्वनाथ पडेलकर, प्रमुख मार्गदर्शिका रूपाली कदम मॅडम, विद्यालयाचे मुख्याध्यापक हिराचंद तानवडे तसेच ग्रामपंचायत अधिकारी शमशुद्दीन साटविलकर उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना सरपंच भुषण पोकळे यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत यासाठी अशा मार्गदर्शनाची गरज आहे. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या कलागुणांनाही प्रोत्साहन देणारी ठरेल, असे त्यांनी नमूद केले. हा उपक्रम संपूर्ण शैक्षणिक वर्षभर सुरू राहणार आहे.
मुख्य मार्गदर्शिका रूपाली कदम यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची प्रभावी तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नृत्यसारख्या कलेतून व्यक्तिमत्व विकास कसा साधता येतो, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे पालकवर्गातूनही कौतुक होत असून, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्याध्यापक हिराचंद तानवडे यांनी व्यक्त केला.
