You are currently viewing कृषी यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी योजनांपासून वंचित; १५ दिवसांत कारवाईचा इशारा

कृषी यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी योजनांपासून वंचित; १५ दिवसांत कारवाईचा इशारा

कृषी यंत्रणेच्या निष्क्रियतेमुळे शेतकरी योजनांपासून वंचित; १५ दिवसांत कारवाईचा इशारा

जिल्हा शेतकरी संघर्ष समितीचे निवेदन; दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषी सेवक व तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे अनेक शेतकरी शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघर्ष समितीने केला आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, ओरस यांना निवेदन देत तातडीने कार्यवाहीची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेक कृषी सेवक शेतकऱ्यांच्या बांधावर जात नाहीत, योजनांची माहिती देत नाहीत तसेच अर्ज भरण्यास सहकार्य करत नाहीत. तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यांकडूनही नियमित आढावा घेतला जात नसल्याने यंत्रणा निष्क्रिय झाल्याचे समितीचे म्हणणे आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
समितीच्या मागण्या पुढीलप्रमाणे :
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी दर महिन्याला सर्व तालुका कृषी अधिकारी व कृषी सेवक यांची आढावा बैठक घेऊन कामाचा लेखाजोखा घ्यावा.
कर्तव्यात कसूर करणाऱ्या व शेतकऱ्यांना सहकार्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करावी.
प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये “योजना दिन” आयोजित करून कृषी सेवकाने शेतकऱ्यांचे अर्ज जागेवर भरून घेण्याचे आदेश तातडीने काढावेत.
दरम्यान, या मागण्यांवर १५ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास जिल्हा कृषी कार्यालय, ओरस येथे लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब सावंत यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा