मुंबई (गुरुदत्त वाकदेकर):
अपॅक या शैक्षणिक संस्थेतर्फे एकोणीसावी इंटरनॅशनल फोटोफ्राय फोटोग्राफी तसेच आठवी एगाता चित्रकला स्पर्धेचे प्रदर्शन उत्साहात पार पडले. द बॉम्बे आर्ट सोसायटी, वांद्रे पश्चिम, मुंबई येथे २५ आणि २६ एप्रिल २०२६ रोजी आयोजित या उपक्रमाला कला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
२५ एप्रिल रोजी प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम मूर्तिकार किरणजी जहांगीर उपस्थित होत्या. भारतातील एकमेव क्ले पोर्ट्रेट आर्टिस्ट म्हणून ओळख असलेल्या किरणजी जहांगीर यांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रख्यात निवेदिका निता माळी यांनी केले. चित्रकला परीक्षक फाइन आर्टिस्ट शार्दूलजी कदम यांनी सहभागींच्या कलाकृतींचे परीक्षण करून विजेत्यांची घोषणा केली.
२६ एप्रिल रोजी प्रमुख पाहुणे म्हणून एबीपी माझा कट्टा येथील प्रज्ञा पोवळे, डेप्युटी प्रोड्युसर व वृत्त निवेदिका, उपस्थित राहिल्या. अपॅकच्या गॅलरीत विजेत्यांची घोषणा करण्यात आली. या स्पर्धेतील विजेती रेणुका घोरपडे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे निवेदन कल्पना उबाळे यांनी केले, तसेच प्रमुख पाहुण्यांची मुलाखतही याच ठिकाणी घेण्यात आली.
फोटोग्राफी परीक्षक आणि ख्यातनाम फोटो जर्नालिस्ट मुकेशजी परपियानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रदर्शनात उपस्थितांना विविध फोटो आणि चित्रकृती पाहण्याची संधी मिळाली. फोटोग्राफी स्पर्धेतील विजेत्यांचा पुरस्कार वितरण सोहळाही पार पडला.
फोटोग्राफी आणि चित्रकला स्पर्धांचे विषय ‘आईस’, ‘ग्लास’ आणि ‘ग्रीनरी’ असे होते. या उपक्रमातून नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळाले आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळाले. या स्पर्धेसाठी आणि या दोन दिवसीय उपक्रमाच्या यशासाठी अपॅकच्या संचालिका अर्चना देशपांडे जोशी यांनी घेतलेल्या अथक परिश्रमांचे कलाक्षेत्रात कौतुक होत आहे.
