आंबोली मार्गावर दाणोली येथे ट्रक पलटी; वाहतूक काही काळ ठप्प
सुदैवाने जीवितहानी टळली; पोलिसांच्या तत्परतेने वाहतूक पुन्हा सुरू
सावंतवाडी
आंबोली मार्गावरील दाणोली येथे मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातामुळे काही काळ मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मोठी गर्दी झाली. ट्रक रस्त्याच्या मधोमध पलटी झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांची लांबच लांब रांग लागली होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिकांच्या मदतीने ट्रक बाजूला करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर अडथळा दूर करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले.
दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.
