पनीर व चीज ॲनालॉग संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील रेस्टॉरंट, कॅटरर्स, हॉटेल्स /फास्ट फूड विक्रेते, चीज ॲनालॉगचे उत्पादर,पनीरचे उत्पादक, पुरवठादार यांनी कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास त्यांच्यावर प्रशासनामार्फत अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६, नियम व नियमने अंतर्गत संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट चालकानी पनीर ॲनालॉग व चीज ॲनालॉग उत्पादकांकडून खरेदी करताना खरेदी बिलावर सदर अन्नपदार्थाचा स्पष्टपणे उल्लेख आहे की नाही याची खात्री करावी नंतरच सदरचे अन्नपदार्थ खरेदी करावेत असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी केले आहे.
अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ हा जनहित व जन आरोग्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा कायदा असून सर्वसामान्य जनतेस सकस, निर्भेळ व सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध करून देणे हा त्याचा प्रमुख उद्देश व उद्दिष्ट आहे. भारत हा दुग्ध उत्पादनात अग्रगण्य देश असून, पनीर हा भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा घटक आहे. पनीर केवळ चविष्टच नाहीतर पोषणमूल्यांनी समृद्ध असल्यामुळे त्याच्या आहारात विशेष स्थान आहे .पनीरमध्ये प्रथिने,कॅल्शियम ही जीवनसत्वे आणि आवश्यक खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. शाकाहारी लोकांसाठी पनीर हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. पनीर व चीज ॲनालॉग मधील फरक: अन्नसुरक्षा व मानके ( अन्नपदार्थ मानके व अन्न मिश्रित पदार्थ) विनियम २०११ मधील विनियम २.१.१ नुसार “पनीर “हा केवळ दुधापासून बनविलेला पदार्थ आहे. याउलट “डेअरी ॲनालॉग” हा दूध व्यतिरिक्त इतर खाद्यतेल, स्टार्च, इमल्सिफायर व इतर घटक वापरून बनविलेला पदार्थ आहे. तो पनीरसारखा दिसतो पण “पनीर “नाही .FSSAI च्या मानांकानुसार हा “चीज ॲनालॉग “या प्रवर्गात मोडतो.
अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग यांच्या निदर्शनास आले आहे, की काही रेस्टॉरंट/ केटरर्स, हॉटेल्स, फास्ट फूड विक्रेते या आस्थापनांमध्ये अन्न पदार्थ तयार करताना चीज ॲनालॉगचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येत असून, त्याबाबत सदर आस्थापनांकडून ग्राहकांना पुरेशी माहिती उपलब्ध करून देण्यात येत नसल्याकारणाने ग्राहकांची दिशाभूल व फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तथापि बाजारात काही ठिकाणी “पनीरॲनालॉग”/”चीज अनालॉग “हे पदार्थ “पनीर” किंवा “चीज “या नावाने किंवा त्या सारख्या नावाने विकले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांची दिशाभूल होत आहे.
अन्नसुरक्षा व मानके कायद्यातील तरतूदी :- अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम १८ (2 ) (e) नुसार उपभोक्त्यांना ते जे अन्न खातात त्याबद्दल योग्य निर्णय घेण्यासाठी अन्नपदार्थातील घटकपदार्थ विषयी माहिती असणे आवश्यक आहे. तसेच अन्नसुरक्षा मानके (Labelling and Display Regulations)२०२०मधील chapter ३ मधील नियमन ९(६) नुसार अन्न व्यवसायिकांने अन्न पदार्थाची ग्राहकांना विक्री करताना, पोषण संबंधित माहिती किंवा त्यातील घटकांची माहिती, तसेच आरोग्य संदेश प्रदर्शित करणे आवश्यक आहे.
राज्य परवानाधारक चीज ॲनालॉग चे उत्पादक, पुरवठादार याना चीज ॲनलॉगची विक्री/ पुरवठा करताना Food Safety and Standards Act २००६ च्या कलम 23 मधिल तरतुदीनुसार अन्नपदार्थाचे पॅकेजिंग व लेबलिंग भारमक अथवा दिशाभूल करणारे नसावे व अन्न पदार्थाचे खरे स्वरुप स्पष्टपणे नमूद करणारे असावे तसेच Food Safety and Standards (Labelling and Display)Regulations २०२० (General Labelling Requirements) नुसार विक्री बिलावर डेअरी ॲनालॉग असा स्पष्ट उल्लेख करणे बंधनकारक आहे.रेस्टॉरंट /कॅटरर्स /हॉटेल्स केटरर्स /फास्टफूड विक्रेते या आस्थापनात जर चीज ॲनालॉग चा वापर करून अन्नपदार्थ तयार करीत असतील तर त्याची विक्री करताना बिलांवर तसेच हॉटेलमध्ये अन्न विक्री करताना मेनू कार्ड/ इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्ड इत्यादी वर सदर अन्नपदार्थ स्पष्ट उल्लेख नमूद करणे आवश्यक आहे.
ग्राहकांनी घ्यावयाची काळजी:-
पनीर खरेदी करताना पॅकबंद उत्पादनावरील लेबल काळजीपूर्व वाचा.”ॲनालॉग “असा उल्लेख आहे का ते तपासा. सुटे पनीर खरेदी करताना विक्रेत्यांकडे ते शुद्ध दुधापासून बनवलेला आहे का याची खात्री करा. संशय असल्यास बिल मागा. हॉटेलमध्ये मेनू कार्डवर पनीर व चीज ॲनालॉग हे दोन स्वतंत्र अन्न पदार्थ आहे का याची खात्री करावी व त्याप्रमाणे आपल्याला जो पदार्थ पाहिजे त्याची ऑर्डर करावी. ॲनालॉग हा आरोग्यास अपायकारक नाही. परंतु त्यातील घटक व पोषण मूल्य पनीरपेक्षा वेगळी असतात .त्यामुळे ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे.
अन्न व्यवसायिकांना निर्देश:- ज्या अन्न व्यवसायिकानी अन्नपरवाना घेतला त्यावेळेस त्यांनी जो मोबाईल फोन संपर्क क्रमांक दिलेला आहे. त्या संपर्क क्रमांकावर प्रशासनाने हॉटेल/ रेस्टॉरंट चालकांना पनीर व चीज ॲनालॉग संदर्भाने उपरोक्त नमूद करावयाचे कार्यवाही संदर्भाने सूचना केलेल्या आहेत. तथापि ज्या अन्न व्यवसायिकानी / परवाना धारकानी अन्नपूरवाना घेते वेळेस स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक दिलेला नाही व कोणा ञयस्थ व्यक्तीचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर दिलेला आहे. अशा अन्न व्यवसायिकांना स्पष्ट सूचना देण्यात येत आहेत की, त्यांनी तात्काळ त्यांच्या परवाना नोंदणी मध्ये स्वतःचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकून घ्यावा अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील सहाय्यक आयुक्त ललित गायकवाड यांनी दिला आहे.
अन्न व औषध प्रशासन ग्राहकांच्या आरोग्याबाबत दक्ष असून अन्नातील भेसळ व दिशाभूल करणाऱ्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कटिबद्ध आहे.ग्राहकांनी अशा प्रकारची दिशाभूल झाल्यास त्याबाबत तक्रार प्रशासनाच्या ०२३६२-२२८८८१ या क्रमांकावर नोंदवावी असेही आवाहन करण्यात येत आहे.
०००००००
