You are currently viewing प्रा. श्याम मानव जसे दिसले तसे 

प्रा. श्याम मानव जसे दिसले तसे 

अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये दि. 25 रोजी सायं. 5 वाजता प्रा. श्याम मानव यांचा कार्यक्रम होत आहे त्यानिमित्त

=============

प्रा. श्याम मानव जसे दिसले तसे 

=============

प्रा. श्याम मानव यांची माझी पहिली भेट पद्मश्री डॉ. बाबा आमटे यांच्या आनंदवनात झाली. आनंदवनात तेव्हा मित्र मेळावा संपन्न व्हायचा. या मित्र मेळाव्याला मी बबन सराडकर आणि अन्य कवी मित्र गेलो होतो. तेव्हा मी जीवन ज्योती हा कवितासंग्रह काढणार होतो. त्यासाठी श्याम मानवांची एक कविता मला आली होती. तेव्हा त्यांचे आडनाव कदम होते. मी त्यांना आपण आनंदवन मित्र मेळाव्यात भेटू असे पत्र पाठविले होते.आनंदवन मित्र मंडळ मेळाव्यात भेटल्यानंतर आम्ही जमलेल्यापैकी कोण कवी आहेत याचा शोध घ्यायला लागलो. त्या सर्वांना एकत्र करून एक काव्य मैफिल देण्याचे आम्ही ठरविले. श्याम मानव यांची माझी पहिली भेट झाली ती कवी म्हणून.

 

आज दि. 25 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता अमरावतीच्या मोर्शी रोडवरील श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये प्रा.श्याम मानव यांचे जाहीर व्याख्यान होत आहे. व्याख्यानाचा विषय अतिशय ज्वलंत आहे. श्याम मानव यांचे व्याख्यान म्हटले म्हणजे लोकांची अलोट गर्दी हे समीकरण ठरलेले आहे.

 

अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये असल्यामुळे प्रा. श्याम मानव यांचा अतिशय जवळचा संपर्क आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अमरावती शहरांमध्ये अंबापेठच्या प्रचंड मोठ्या मैदानावर श्याम मानवांची सात दिवसांची सलग व्याख्यानमाला घेण्याचा मान मला मिळाला. त्याचे असे झाले की श्याम मानवांना अमरावतीला सात दिवसाची व्याख्यानमाला घ्यायची होती. त्यासाठी अमरावतीचच्या सर्किट हाऊसवर आमच्या सर्वांची एक सभा झाली . व्याख्यानमाला घ्यायचे ठरले.सर्वांनी माझ्याकडे बोट दाखविले . काठोळे सरच हे अरेंज करू शकतात असे सर्वांचे मत पडले.तेव्हा मला पीएच.डी चा प्रबंध सादर करावयाचा होता.1994 च्या डिसेंबर मधली ही गोष्ट. मी चक्क नकार दिला. प्रा. शाम मानव मला म्हणाले सर तुमची पीएच.डी महत्त्वाची आहे की लोकजागृती .अर्थातच मी लोकजागृतीला पसंती दिली आणि श्याम मानवांनी मला या सात दिवसाच्या व्याख्यानमालेचे आयोजन करावे असे सांगितले. मी सर्वांना निक्षून सांगितले की मी निधी गोळा करून देईल. परंतु स्टेज उभारणे .सतरंज्या टाकणे .नियोजन करणे याबाबतीत मात्र मी मदत करू शकणार नाही. टाटा मोटर्स संचालक श्री विजय मोकाशी व त्यांच्या टीमने ही जबाबदारी स्वीकारली. आणि त्यांनी ती यशस्वी करून दाखविली.

 

अमरावतीच्या अंबापेठ येथील मनीबाई गुजराती हायस्कूल समोरील प्रचंड मोठ्या मैदानावर ही सात दिवसाची व्याख्यानमाला संपन्न झाली. दररोज सुमारे दहा हजार लोक या व्याख्यानमालेला असायचे. व्याख्यानमाला तंतोतंत साडेसहाला सुरू व्हायची आणि साधारणपणे अडीच तासानंतर संपायची. तो काळ दूरदर्शनचा आणि मोबाईलचा नव्हता. त्यामुळे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या व्याख्यानमालेला मिळाली. अनेकांनी तर स्वतःच्या कारमध्ये बसून ही व्याख्यान माला ऐकली. अमरावती शहराच्या इतिहासामध्ये सलग सात दिवस कोणत्याही व्यक्तीची एवढी प्रचंड गर्दी असलेली बौद्धिक व्याख्यानमाला झाली नव्हती आणि आता मोबाईलच्या जमान्यात तर ते होणे शक्यही नाही.

या आयोजनामध्ये मी डॉ. बबन बेलसरे, विजय मोकाशी, लक्ष्मीकांत पंजाबी, गणेश हलकारे या सर्वांनी मनापासून प्रयत्न केले. हजारोच्या संख्येने पत्रिका वाटल्या गेल्या. हजारोच्या संख्येत निधी गोळा केला गेला. पण निधी गोळा करण्याचे काम मी एकट्यानेच केले . तेव्हा जाधव उद्योग समूहाचे श्री गुलाबराव जाधव, वामनराव जाधव, शंकरराव जाधव, मनोहर जाधव, विजयराव जाधव, आमच्या मदतीला आले . डॉ्.शोभाताई पोटोडे, जयप्रकाश पोटोडे यांनी देखील भरीव मदत केली. खरं म्हणजे त्या काळात निधी गोळा करणे देखील कठीणच होते .परंतु माझ्या सामाजिक संपर्कामुळे आणि श्याम मानवांच्या व्याख्यानमालेमुळे सर्वांनी सढळ हाताने मदत केली. या व्याख्यानमालेचे पूर्ण रेकॉर्डिंग करण्यात आले व पुढे भविष्यात हे रेकॉर्डिंग सिडीच्या माध्यमातून लोकांसमोर आले व प्रचंड प्रमाणात त्याला प्रतिसादही मिळाला. हजारो लोकांनी या सिडी विकत घेतल्या. प्रा. श्याम मानवांच्या पुस्तकांपेक्षा सिडीला जास्त प्रतिसाद मिळाला .कारण की ते सगळे स्टुडिओमध्ये केलेले रेकॉर्डिंग नव्हते तर प्रत्यक्ष लाईव्ह रेकॉर्डिंग होते.

 

त्यानंतर लगेचच आम्ही अमरावतीच्या महेश भवनमध्ये श्याम मानवांची एक तीन दिवसाची संमोहन कार्यशाळा आयोजित केली .अर्थातच त्याला 1100 रुपये तिकीट होते. 1994 साली अकराशे रुपये तिकीट म्हणजे खूप झाले. आम्ही स्वतः पण तिकीट काढले. अमरावती शहरातील सगळे प्रतिष्ठित या संमोहन कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. त्यामध्ये डॉक्टर होते. वकील होते .इंजिनीयर होते. प्राध्यापक होते. अकराशे रुपये तिकीट असुनही महेश भवन मध्ये पाय ठेवायला जागा नव्हती. एवढी प्रचंड गर्दी अकराशे रुपये फी असूनही या कार्यशाळेला होती.

श्याम मानवांना कोणताही कार्यक्रम अरेंज करायचा असला तर ते आमचे जिवलग मित्र डॉ. बबन बेलसरे यांना फोन करतात .हॉल बुक करण्यापासून तर इतर सर्व उर्वरित कामे डॉ. बबन बेलसरे व त्यांची टीम करते .बबनरावांवर जबाबदारी सोपवली म्हणजे ते ती समर्थपणे पार पाडतात याची कल्पना श्याम मानवांना आहे.

आज प्रा.शाम मानवांचा सर्वत्र चांगला बोलबाला आहे. सुरुवातीच्या काळात कार्यक्रम अमरावतीला असो की चिखलदऱ्याला आम्ही आमच्या संपूर्ण टीमसह प्रा. शाम मानव यांच्या दिमतीला असायचो . चिखलदऱ्याची श्याम मानवांची राज्यस्तरीय कार्यशाळा आम्ही अविस्मरणीय करून दाखविली.तेवढीच अमरावतीची पण. प्रा. श्याम मानव आणि श्री नरेंद्र दाभोळकर यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि प्रा. शाम मानव आजही करीत आहेत. समाजातील अंधश्रद्धा काही प्रमाणात कमी करण्यामध्ये या दोघांचाही मोलाचा वाटा आहे. श्री नरेंद्र दाभोळकरांनाही खूप करायचे होते पण आज ते आपल्यात नाहीत .पण ते नसले तरी प्रा. शाम मानव हे काम त्यांच्या सर्व सहकारी मित्रांना सोबत घेऊन उत्तम रीतीने करीत आहेत . मध्यंतरी त्यांना येणाऱ्या धमक्यामुळे महाराष्ट्र शासनाने त्यांना सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली.आज दिनांक 25 ला या व्याख्यानमालेनिमित्त हे अमरावतीला येत आहेत त्यानिमित्त त्यांचे स्वागत आहे .

=============

प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक

मिशन आयएएस

अमरावती कॅम्प

9890967003

प्रतिक्रिया व्यक्त करा