कनेडी-नरडवे रोडवर दुचाकी अपघात; जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू
कणकवली, मध्यरात्री घडली घटना; बिहारमधील कामगाराचा दुर्दैवी अंत
कणकवली :
मित्राला रेल्वे स्टेशनवर सोडून परतत असताना कनेडी-नरडवे रोडवर भरधाव वेगात दुचाकी चालवत असताना ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या सुकर शिवनाथ प्रसाद (वय ४२, मूळ रा. बिहार, सध्या रा. जानवली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास बांधकरवाडी स्टॉपजवळ घडली.
सुकर प्रसाद हे जानवली येथील सागर कोकीतकर यांच्याकडे काम करत होते व तेथेच वास्तव्यास होते. मंगळवारी रात्री सुमारे ११.३० वाजता त्यांनी आपल्या गावाकडील मित्र पंकज कुमार याला कणकवली रेल्वे स्टेशनवर सोडले. काही वेळ तेथे थांबल्यानंतर ते एकटेच मोटरसायकलने कनेडी-नरडवे रोडने जात असताना भरधाव वेगामुळे गाडीवरील ताबा सुटला व त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला जाऊन पडली.
या अपघातात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती त्यांच्या भावाने, अर्जुन प्रसाद यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली असून पुढील तपास सुरू आहे.
