You are currently viewing विक्रांत सावंत यांचा शिक्षण प्रसारक मंडळाकडून भव्य सत्कार
Oplus_16908288

विक्रांत सावंत यांचा शिक्षण प्रसारक मंडळाकडून भव्य सत्कार

शिक्षण व कृषी समिती सदस्यपदी निवड झाल्यानंतर सावंतवाडीत अभिनंदन सोहळा उत्साहात

मान्यवरांची उपस्थिती; आगामी काळात मोठी राजकीय झेप घेण्याचा विश्वास व्यक्त

सावंतवाडी :

जिल्हा परिषद निवडणूक २०२६ मध्ये माजगाव मतदारसंघातून विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून शिक्षण व कृषी समिती सदस्य म्हणून निवड झालेल्या विक्रांत सावंत यांचा सावंतवाडीत सत्कार करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी यांच्या वतीने राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमात विक्रांत सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, खजिनदार सी. एल. नाईक, चंद्रकांत सावंत, अमोल सावंत आदी उपस्थित होते.

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले की, कै. भाईसाहेब सावंत व कै. विकास सावंत यांचा वारसा विक्रांत सावंत यांनी पुढे नेला आहे. अनेक नेत्यांसोबत काम करण्याचा अनुभव असून जनसामान्यांसाठी केलेल्या कामाच्या जोरावर त्यांनी पुढील काळातही अशीच प्रगती करावी. जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत पोहोचण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनीही विक्रांत सावंत यांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांच्या समाजाभिमुख स्वभावामुळे त्यांचे राजकीय भवितव्य उज्ज्वल असल्याचे सांगितले.

दरम्यान, अमोल सावंत, वसुधा मुळीक, प्रा. केदार म्हसकर, दशरथ शृंगारे यांनी मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना विक्रांत सावंत यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद, मतदारांचे प्रेम आणि कुटुंबीयांच्या पाठबळामुळेच हा विजय मिळाल्याचे नमूद केले. आपल्या पदाचा उपयोग जनतेच्या कल्याणासाठी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात सोनाली सावंत, के. टी. परब, नारायण देवरकर, वसुधा मुळीक, सीमा मठकर, संप्रवी कशाळीकर, डॉ. सुमेधा नाईक-धुरी, नामदेव मुठे, जगदीश धोंड, मेघश्याम काजरेकर, अर्चना सावंत आदींसह संस्थेचे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संप्रवी कशाळीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. मिलिंद कासार यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. सुमेधा नाईक-धुरी यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा