You are currently viewing सर्वोदय नगरातील समस्यांवर नागरिकांचा नगरपरिषदेवर मोर्चा; १ मे रोजी उपोषणाचा इशारा

सर्वोदय नगरातील समस्यांवर नागरिकांचा नगरपरिषदेवर मोर्चा; १ मे रोजी उपोषणाचा इशारा

सर्वोदय नगरातील समस्यांवर नागरिकांचा नगरपरिषदेवर मोर्चा; १ मे रोजी उपोषणाचा इशारा

रस्ते, गटारे व गॅस पाईपलाईन कामांमुळे नागरिक त्रस्त; गॅस कंपनीच्या कारभारावरही संताप

सावंतवाडी

येथील सर्वोदय नगर परिसरातील विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी आज नगरपरिषदेवर धडक दिली. रस्ते, गटारे आणि गॅस पाईपलाईनच्या प्रलंबित कामांमुळे नागरिक हैराण झाले असून, येत्या ३० एप्रिलपर्यंत कायमस्वरूपी उपाययोजना न झाल्यास १ मे महाराष्ट्र दिनी शांततामय मार्गाने लक्षवेधी उपोषण करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

यावेळी नागरिकांनी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांची भेट घेऊन आपल्या समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. सर्वोदय नगरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाणी व गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी वारंवार रस्ते खोदण्यात आले आहेत. मात्र काम पूर्ण होऊन दोन महिने उलटूनही रस्त्यांची दुरुस्ती न झाल्याने परिसरात खड्डे व धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना श्वसनाचे विकार व ॲलर्जीचा त्रास सहन करावा लागत असून, नुकतेच दुरुस्त केलेले रस्ते पुन्हा खणल्याबद्दल संताप व्यक्त करण्यात आला.

यावर मुख्याधिकारी औंधकर यांनी रस्त्यांच्या कामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे सांगत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खडीकरणाचे काम सुरू होईल, अशी माहिती दिली. नगरसेविका निलम नाईक यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्याशी चर्चा करून कामाच्या मंजुरीसाठी स्थायी समितीची बैठक तातडीने बोलावण्यात आल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान, गटारांमध्ये माती व कचरा साचल्याने सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यापूर्वी स्वच्छता न झाल्यास आरोग्याच्या समस्या गंभीर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. तसेच विजेच्या व इंटरनेटच्या अस्ताव्यस्त तारांमुळे आणि अयोग्य स्पीड ब्रेकरमुळे अपघाताचा धोका वाढल्याचेही निदर्शनास आणून दिले.

यावेळी महाराष्ट्र नॅचरल गॅस कंपनीच्या कारभारावरही जोरदार टीका करण्यात आली. गॅस बिलाबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याने नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. याच गोंधळाचा फायदा घेत एका महिलेला ‘फ्रॉड कॉल’ करून लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकाराची गंभीर दखल घेत नगरसेविका निलम नाईक यांनी गॅस कंपनीच्या अधिकाऱ्यांना फोनवरून जाब विचारत तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

या शिष्टमंडळात गुरूदत्त कामत, दिक्षा कामत, कविता नाईक, मेघना राऊळ, शरयू बार्देसकर, संभाजी नाईक, सिद्धेश नेरूरकर, योगेश कुलकर्णी, गुंडू साटेलकर यांच्यासह सर्वोदय नगरमधील महिला कमिटी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा