घाईगडबडीत काढलेली रॅली अविचारी; शैक्षणिक संस्थांचा राजकारणासाठी वापर टाळावा : सौ. साक्षी वंजारी
सावंतवाडी :
सावंतवाडी येथे भाजपने काढलेल्या रॅलीवर सिंधुदुर्ग महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी जोरदार टीका केली आहे. ही रॅली घाईगडबडीत आणि अविचारी पद्धतीने आयोजित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. “उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग” या म्हणीप्रमाणे ही कृती असल्याचे सांगत, प्रसिद्धीसाठी घेतलेला हा उपक्रम असल्याचा टोला त्यांनी लगावला.
महिला आरक्षण विधेयकाबाबत महत्त्वाचा दिवस असताना अशा प्रकारे रॅली काढणे योग्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, शैक्षणिक संस्थांचा राजकीय वापर करणे चुकीचे असून विद्यार्थ्यांना दिशाभूल करून त्यांचा राजकारणासाठी उपयोग करू नये, अन्यथा कारवाईची मागणी केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
काँग्रेसची भूमिका “समावेशक प्रतिनिधित्व” या तत्त्वावर आधारित असल्याचे वंजारी यांनी स्पष्ट केले. विशेषतः अनुसूचित जाती-जमाती (SC/ST) आणि इतर मागासवर्गीय (OBC) महिलांना राजकीय प्रक्रियेत संधी मिळावी यासाठी आरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना दुहेरी भेदभावाचा सामना करावा लागतो—लिंग आणि सामाजिक स्तर या दोन्ही कारणांमुळे—आणि आरक्षण हे त्यावर प्रभावी उत्तर ठरते, असे त्या म्हणाल्या.
पंचायत राज व्यवस्थेमध्ये महिला आरक्षणामुळे स्थानिक पातळीवर पाणी, आरोग्य आणि शिक्षण यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर अधिक लक्ष केंद्रित झाले असल्याचा अनुभवही त्यांनी मांडला. तसेच, ओबीसी महिलांसाठी स्वतंत्र उप-कोट्याची (sub-quota) मागणी काँग्रेसने सातत्याने केली असून, त्याशिवाय आरक्षणाचे फायदे मर्यादित घटकांपर्यंतच राहण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजपने अलीकडे मांडलेले विधेयक हे महिला आरक्षणाचे नसून मतदारसंघ पुनर्रचनेशी (डिलिमिटेशन) संबंधित असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच मंजूर झाले असून, त्याची अंमलबजावणी डिलिमिटेशनशी जोडून ठेवणे म्हणजे प्रत्यक्षात विषय पुढे ढकलण्याचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.
काँग्रेसची भूमिका स्पष्ट असून 2023 मध्ये मंजूर झालेल्या महिला आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी, याला पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे वंजारी यांनी शेवटी सांगितले
