गडकरी बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्याने मंदिराचा जीर्णोद्धार पूर्ण
भजन, सांस्कृतिक कार्यक्रम, दशावतार व ऐतिहासिक नाटकांनी सोहळ्याची रंगत
कुडाळ/प्रतिनिधी :
शिवापूर येथील श्री देव भैरव-जोगेश्वरी मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा दि. ८, ९ व १० मे २०२६ रोजी मोठ्या भक्तिभावात व उत्साहात पार पडणार आहे. हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून गावातील श्रद्धा, एकोप्याचा आणि भक्तीभावाचा उत्सव ठरणार आहे.
मंदिराचा जीर्णोद्धार, नवीन गाभाऱ्याचे बांधकाम आणि प्राणप्रतिष्ठेची सर्व तयारी गडकरी बांधव, ग्रामस्थ व हितचिंतक यांच्या उदार देणग्या व सहकार्यामुळे पूर्णत्वास आली आहे. या कार्यासाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे मंदिर समितीच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
तीन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ८ मे रोजी भजन व “महाराष्ट्राची लोकधारा” हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. दि. ९ मे रोजी हळदीकुंकू समारंभ, भजन आणि कलेश्वर दशावतार नाट्यमंडळाचे ट्रिकसीनयुक्त दशावतारी नाटक सादर होणार आहे. दि. १० मे रोजी भजन, महिलांच्या फुगड्या आणि रात्री ऐतिहासिक “व्यंकोजी वाघ” हे नाटक सादर होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.
या पवित्र सोहळ्याला उपस्थित राहून भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
