You are currently viewing शिरोड्यात ७ कोटींचे अंबरग्रीस जप्त; चौघांना अटक

शिरोड्यात ७ कोटींचे अंबरग्रीस जप्त; चौघांना अटक

शिरोड्यात ७ कोटींचे अंबरग्रीस जप्त; चौघांना अटक

वनविभागाचा सापळा यशस्वी; ब्लू व्हेलच्या उलटीच्या बेकायदेशीर विक्रीचा पर्दाफाश

वेंगुर्ले (शिरोडा):

शिरोडा परिसरात ब्लू व्हेल माशाच्या उलटीपासून तयार होणारे मौल्यवान अंबरग्रीस बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाने सापळा रचून धाड टाकली. या कारवाईत सुमारे ९.१२० किलो वजनाचे अंदाजे ७ कोटी रुपये किमतीचे अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून चौघांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी रणजित रामचंद्र नायर (४०), गुरुनाथ नाईक (७०), विभव आडारकर (३५) (रा. परबगाव, शिरोडा) तसेच निलेश मनोहर पांडजी (३३, रा. रेडी) यांना संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे.
वनक्षेत्रपाल सचिन शिडतुरे (फिरते पथक, सावंतवाडी) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुरुवार, १६ एप्रिल रोजी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा, कोल्हापूर दक्षता विभागीय वन अधिकारी संजय वाघमोडे व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे नियोजन करण्यात आले. बनावट ग्राहक तयार करून सापळा रचण्यात आला आणि सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले.
आरोपींकडून ९.१२० किलो अंबरग्रीस जप्त करण्यात आले असून ते सुमारे ७ कोटी रुपयांना विक्री करण्याचा त्यांचा उद्देश होता, अशी माहिती वनविभागाने दिली.
ब्लू व्हेलच्या उलटीपासून तयार होणाऱ्या अंबरग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असून त्याला प्रचंड किंमत मिळते. त्यामुळे पैशाच्या मोहापायी अशा प्रकारचे वनगुन्हे वाढताना दिसत आहेत.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारचे अंबरग्रीस किंवा वन्यप्राण्यांशी संबंधित कोणतेही संशयास्पद पदार्थ आढळल्यास तात्काळ जवळच्या वन अधिकाऱ्यांना माहिती द्यावी.
ही कारवाई सचिन शिडतुरे (वनक्षेत्रपाल, फिरते पथक), अमित कटके (वनक्षेत्रपाल, संशोधन दोडामार्ग), सावळा कांबळे (वनपाल, मठ), महेश पाटील (वनपाल, फिरते पथक), ब्रम्हकुमार भोजने, संग्राम पाटील, अनिकेत माने, रविंद्र पाटील, रिषीका होले, नितीन सावंत आदींच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा