You are currently viewing स्वरांची जादू, भावनांची भाषा आणि आयुष्याच्या प्रत्येक छटेचा अर्थ आपल्या गाण्यांतून सांगणाऱ्या आशा भोसले यांना ही अर्थपूर्ण शब्दांजली

स्वरांची जादू, भावनांची भाषा आणि आयुष्याच्या प्रत्येक छटेचा अर्थ आपल्या गाण्यांतून सांगणाऱ्या आशा भोसले यांना ही अर्थपूर्ण शब्दांजली

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री संगीता कुलकर्णी लिखित अप्रतिम लेख*

 

*स्वरांची जादू, भावनांची भाषा आणि आयुष्याच्या प्रत्येक छटेचा अर्थ आपल्या गाण्यांतून सांगणाऱ्या आशा भोसले यांना ही अर्थपूर्ण शब्दांजली*…

 

 

भारतीय संगीतविश्वातील अजरामर स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांना लेखरूपी श्रद्धांजली अर्पण करताना शब्द अपुरे पडतात कारण त्यांचा आवाज म्हणजेच भावना, जीवन आणि संगीताचा अखंड प्रवाह होय… त्यांच्या असंख्य गाण्यांतून त्यांनी प्रत्येक श्रोत्याच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे.

आशा ताईंचा आवाज हा केवळ गाण्यांचा नाही तर तो काळाचा साक्षीदार आहे… आशाताईंचा आवाज म्हणजे भावनांचा अथांग सागर… आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला स्पर्श करणारा अनुभव…. “राधा ही बावरी” मधील निरागस प्रेम, “माझे माहेर पंढरी” मधील भक्तीभाव, आणि “चुरा लिया है तुमने” मधील खट्याळ रोमँटिकता “पिया तू अब तो आजा” मधील त्यांचा खट्याळ आणि चैतन्यशील अंदाज, “दिल चीज़ क्या है” मधील नजाकत… स्वतःला अर्पण करण्यातील सौंदर्य आणि “इन आंखों की मस्ती” मधील भावपूर्ण गूढता तर “दम मारो दम” मधून बंडखोर तरुणाईचा आवाज बनल्या… “झुमका गिरा रे” मधील खट्याळपणा आणि “ये मेरा दिल” मधील आत्मविश्वास या प्रत्येक गाण्यांतून त्यांनी स्वतःला वेगवेगळ्या रूपांत साकारलं…. स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.

त्यांच्या आवाजात एक विलक्षण लवचिकता होती जी कोणत्याही संगीत शैलीला सहजपणे कवेत घेत असे… प्रत्येक गाण्यातून त्यांनी जीवनातील विविध छटा जिवंत केल्या….वेगवेगळ्या भावनांना स्वर दिला.. त्यांचा स्वर कधी कोमल झुळूक बनून मनाला स्पर्श करतो तर कधी उत्साहाची लाट बनून अंगात जोश भरतो….प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपल्या गायकीची वेगळी ओळख निर्माण केली….

मराठी संगीतातही त्यांचे योगदान तितकेच मोलाचे आहे. “चांदणे शिंपीत जाशी” सारख्या गाण्यांतून त्यांनी कोमल भावनांना सुरेल स्पर्श दिला. त्यांच्या आवाजातली गोडी, सहजता आणि भावस्पर्शीपणा यामुळे ही गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यांनी केवळ गाणी गायली नाहीत तर प्रत्येक शब्दाला आणि भावनेला आत्मा दिला..त्यांच्या गाण्यांमधूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते सहज, बहुगुणी आणि सदैव ताजेतवाने…

त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी हजारो गाणी विविध भाषांमध्ये गायली… हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपल्या आवाजाची मोहिनी पसरवली… मराठी, हिंदी, गझल, पॉप—कोणतीही शैली असो आशाताई प्रत्येक ठिकाणी सहजपणे रुळल्या. त्यांच्या आवाजातली लवचिकता आणि भावनांची खोली यामुळेच त्यांची गाणी काळाच्या पलीकडे गेली.

संगीतकार आर. डी. बर्मन यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. या जोडीने भारतीय संगीताला एक नवीन दिशा दिली, जिथे पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचाही सुंदर संगम दिसून येतो.

आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सूर नाहीत तर ती आपल्या आयुष्याच्या आठवणींशी जोडलेली भावना आहेत. ..कधी आनंदाचे क्षण, कधी विरहाचे दिवस, तर कधी स्वतःला शोधण्याचा प्रवास म्हणूनच त्या केवळ गायिका नाहीत तर आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत…त्यांच्या प्रत्येक गीतात एक कथा आहे एक अनुभव आहे जो आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावासा वाटतो.

आशा भोसले यांचा आवाज हा काळाच्या पलीकडे जाणारा आहे. त्यांनी प्रत्येक पिढीला काही ना काही दिलं आहे कधी प्रेमाची गोडी, कधी विरहाची वेदना, तर कधी जीवनाचा उत्साह. त्यांच्या गाण्यांतून जीवनाच्या प्रत्येक भावनेला स्वर मिळाला आहे…. आशाताईंची गाणी म्हणजे केवळ सुरावट नव्हे तर जीवनाचा आरसा आहेत… आशाताईंचा आवाज आपल्याला शिकवतो की आयुष्य एकसुरी नसते ते अनेक रंगांनी भरलेले असते. कधी हसू, कधी अश्रू, कधी प्रेम तर कधी एकांत.. या सगळ्यांना त्यांनी आपल्या गाण्यांतून स्वर दिला.

आज त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांचा प्रत्येक स्वर अजूनही हवेत दरवळतो आहे… त्यांचा आवाज प्रत्येक सुरातून, प्रत्येक गाण्यातून आपल्याशी संवाद साधत राहील. त्यांच्या गाण्यांतूनच त्या सदैव जिवंत राहतील…मनात, आठवणीत, आणि प्रत्येक सुरांत… जीवनाला सुंदर बनवणारा एक मधुर स्वर बनून…

आज त्यांना अभिवादन करताना त्यांच्या गाण्यांतूनच त्यांची आठवण जिवंत ठेवणं हीच खरी आदरांजली ठरेल कारण त्यांचा आवाज कधीच थांबणार नाही तो प्रत्येक सुरात, प्रत्येक आठवणीत आणि प्रत्येक हृदयात सदैव घुमत राहील.

आशा भोसले या केवळ एक गायिका नाहीत तर त्या एक भावना आहेत…

संगीताच्या इतिहासात सदैव जिवंत राहणारी एक अमर स्वरकन्या…

 

लेखिका/कवयित्री

संगीता कुलकर्णी

ठाणे@

9870451020

प्रतिक्रिया व्यक्त करा