प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रस्त्यावर खड्डे; नगरसेवक देव्या सूर्याजींचा पुढाकार
तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्याने स्वतःच सिमेंट काँक्रीटने दुरुस्ती; नागरिकांत समाधान, प्रशासनावर टीका
सावंतवाडी
शहरातील प्रभाग क्रमांक ६ मध्ये पाणी पुरवठा विभागाने दुरुस्तीच्या कामासाठी मुख्य रस्ते खोदून ठेवले होते. मात्र काम पूर्ण झाल्यानंतरही संबंधित विभागाने हे खड्डे बुजविण्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे संतप्त झालेले नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी अखेर स्वतः पुढाकार घेत सिमेंट काँक्रीटच्या सहाय्याने हे खड्डे बुजवून घेतले.
रहदारीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. अपघाताचा धोका वाढल्याने स्थानिक नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत नगरसेवक सूर्याजी यांनी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी संजय पोईपकर तसेच संबंधित सभापती यांचे वारंवार लक्ष वेधले होते. मात्र अनेक दिवस उलटूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने त्यांनी प्रशासनाची वाट न पाहता थेट कृती केली.
या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करताना सूर्याजी म्हणाले की, शहरातील मुख्य रस्त्यांवरील समस्या देखील प्रशासन गांभीर्याने घेत नाही, ही दुर्दैवी बाब आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन खड्डे बुजवावे लागले.
दरम्यान, नगरसेवकांच्या या तत्परतेमुळे प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले, तरी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
