You are currently viewing नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य गौरव सोहळा दिमाखात
Oplus_16908288

नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त भव्य गौरव सोहळा दिमाखात

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह दिग्गज नेत्यांची उपस्थिती

प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा गौरव; कोकण विकासातील योगदानावर विशेष भर

राणे यांचे सडेतोड, अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व पुन्हा अधोरेखित

कणकवली :

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सोहळा उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात राज्य व केंद्रातील दिग्गज नेत्यांनी उपस्थित राहून खा. नारायण राणे यांच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा गौरव केला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यातील दमदार नेतृत्व म्हणजे नारायण राणे. माझ्या राजकीय प्रवासाची सुरुवात त्यांच्या नेतृत्वाखाली झाली. सभागृहात केलेल्या माझ्या पहिल्या भाषणानंतर त्यांनी पाठवलेली चिठ्ठी आजही लक्षात आहे. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी अत्यंत प्रभावी कामगिरी केली. अर्थसंकल्पावर त्यांनी केलेली भाषणे सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणणारी ठरत असत. कोणत्याही विषयाचा अभ्यास करून ते सडेतोड भूमिका मांडतात.

ते पुढे म्हणाले की, राणे साहेबांनी गोरगरीबांसाठी काम केले. अनेकांना घरे मिळवून दिली. गुणवत्तेवर कधीही तडजोड केली नाही. कोकणच्या विकासासाठी त्यांनी मोठे योगदान दिले. मराठी माणसाचा अभिमान त्यांनी कायम जपला. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांचा शताब्दी वर्षाचा सोहळा आपण याच मैदानावर साजरा करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री आशिष शेलार, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पालकमंत्री नितेश राणे, नामदार उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, आमदार दीपक केसरकर, आमदार प्रसाद लाड, आमदार निलेश राणे, सौ. नीलमताई राणे, भाजप महाराष्ट्र उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

तसेच भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, जि. प. अध्यक्ष प्रमोद कामत, जि. प. उपाध्यक्ष दादा साईल, भाजप महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्री, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्री उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, खा. नारायण राणे यांचे जीवन मला अतिशय जवळून पाहण्याची संधी मिळाली. त्यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले. वडील गिरणी कामगार होते आणि आईचा डोक्यावर हात होता. लोकाधिकार समितीच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यातून त्यांना जी संधी मिळाली त्याचं त्यांनी सोनं केलं. विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केलेली कामगिरी सर्वांसमोर आहे. अठरा ते वीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात काम करण्याची संधी मिळाली. माझे पारिवारिक जेष्ठ मित्र म्हणून नारायण राणे यांचं नाव आहे. माझ्या कामांत ज्या ज्या वेळी अडचणी आल्या तेव्हा ते माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले.

ते पुढे म्हणाले की, भूतकाळातील इतिहास लक्षात ठेवायचा आणि वर्तमानकाळात भविष्याचा इतिहास घडवायचा असतो. स्पष्ट विचार, परखड नेतृत्व, ‘हो ते हो नाही ते नाही’ अशी त्यांची कार्यशैली आहे. राणे साहेबांनी कोणताही निर्णय घेताना लोकांचं हित लक्षात घेतलं. प्रशासकीय कौशल्य मंत्री म्हणून लक्षात आलं. महसूल विभागाची जबाबदारी असताना ते सर्वात प्रभावी कामगिरी करणारे मंत्री म्हणून ओळखले गेले. त्यांनी सत्ताधाऱ्यांना नेहमीच धारेवर धरले. कोकणचा विकास, रोजगार, औद्योगिकीकरण यासाठी ते सातत्याने झटत राहिले. महाराष्ट्रासह देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची गरज आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना साथ दिली. त्यांचा संसार सुखी राहो. राणे साहेब शब्दाचे पक्के आहेत. यावर्षी मे महिन्याआधी मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होईल तसेच कोल्हापूर-रत्नागिरी मार्ग पूर्ण होईल असे त्यांनी सांगितले.

सुनिल तटकरे म्हणाले, चेंबूरमध्ये काम करताना हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करताना राजकीय वाटचाल सुरू केली. मुंबई महापालिकेच्या समितीचा अध्यक्ष सलग तीन वर्ष कोण राहील असेल तर राणे साहेब. १९९० साली राणे साहेब कणकवलीत निर्वाचित झाले. राणे साहेब आणि माझ्यात ऋणानुबंध तयार झाले. राणे साहेब जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांना आठ नऊ महिन्यांचा कालावधी मिळाला. जर या नेत्याला अधिक वेळ मिळाला असता तर कोकणचा कायापालट झाला असता. विरोधी पक्ष नेता असताना मला वेगळा अनुभव मिळाला. राणे साहेब उत्तम भाषण द्यायचे. अभ्यासू विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी चांगले काम केले. शिवसेना प्रमुख हयात असताना काय पद दिली जातात ते सांगणारा आणि अनुभवणारा नेता म्हणजे नारायण राणे. रंगशारदा मधील त्यांचे भाषण अजूनही आठवते. राणे साहेब आक्रमक स्वभावाचे नेते. उत्तम पद्धतीने त्यांनी कामगिरी बजावली. काँग्रेसने कधीही त्यांना मुख्यमंत्री केले नसते. आज मला काही टीका करायची नाही. नारायण राणे विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना ते पाहा आणि तसं काम करण्याचा प्रयत्न करा असे आम्हाला पवार साहेबांनी सांगितले. मला तीन विधानपरिषद मध्ये जे मतदान झालं त्याच श्रेय राणे साहेबाना जात. त्यांनी उभारलेले मेडिकल कॉलेज हे मोठे काम आहे. मराठी भाषेवर त्याचं प्रभुत्व आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘राणे पॅटर्न’ हा फक्त राणेच दाखवू शकतात. ते जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत दिसून आले आहे. जीवनात ही घडी अशीच राहू दे अशा शब्दात त्यांनी राणे यांना शुभेच्छा व्यक्त केल्या.

रविंद्र चव्हाण म्हणाले की, दादांबद्दल वाढदिवसानिमित्त काय बोलावे हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी धडे घेतले पाहिजेत. मी दादांच्या नेतृत्वाखाली भाजप कोकणात वाढत चालले आहे असे सांगतो. कोकणातील कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम दादांनी केले. दादांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर भाजपाची वाढ झाली. २००९ ला मी जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत गेलो तेव्हा दादांची भेट झाली. त्यांनी मला सांगितले की ज्या क्षेत्रातून आला आहेस तिथे अशी संधी मिळणे कठीण आहे, प्रामाणिकपणे काम कर. दादांच्या हाताला मार लागलेला असून त्या परिस्थितीतही ते सभागृहात आले. पक्षातील सर्व आमदार दादांसोबत होते. त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत आहोत. गणरायाच्या चरणी प्रार्थना दादांना चांगले आरोग्य लाभो.

उदय सामंत म्हणाले की, २००४ ला विधानसभेचा आमदार झालो तेव्हा शपथ कशी घ्यायची हे माहिती नव्हतं. त्यावेळी विरोधी पक्षनेते म्हणून राणे साहेब होते. त्यांनी मला मार्गदर्शन केले. माझं नाव उदय सावंत असं घेतलं गेलं होतं, तेव्हा त्यांनी दुरुस्ती करून घेतली. संघर्ष झाल्यावर काय बदल केले पाहिजेत ते सांगणारे राणे साहेबच होते. आमच्यात सुधारणा करण्याचा अधिकार आई-वडिलांप्रमाणे त्यांना आहे. राजकारणाचा संस्कार जपण्याचे काम त्यांनी केले आहे.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक करताना राणे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाचा गौरव केला. आयुष्यभर झगडत शून्यातून विश्व निर्माण करणारे आणि कोकणचा बुलंद आवाज असलेले राणे साहेब शब्दाला जागणारे नेतृत्व असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. कोकणातील जनतेच्या मनात “दादा” म्हणून असलेले स्थान आणि मराठी भाषेचा सन्मान राखणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी खासदार नारायण राणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा अमृतमहोत्सवी सोहळा माझ्या दोन्ही चिरंजीवांनी आणि कार्यकर्त्यांनी आयोजित केला आहे. उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणाला उत्तर देणे कठीण आहे. आयुष्यात अनेक मंत्री आणि नेत्यांना जवळून पाहण्याची संधी मिळाली. अनेक वेळा राज्याच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची संधी मिळाली. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना भेटण्याचा योग आला. आयुष्यात निर्धार, निश्चय आणि मेहनत असेल तर काहीही अशक्य नाही. मला इथपर्यंत आणणारी शिडी म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे मार्गदर्शन. त्यांच्या सभांना मी आणि माझा मित्र हार घालून जायचो आणि त्यातूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला. मी आयुष्यात कधी पद मागितले नाही, ते मला दिले गेले. महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक म्हणून काम करत राहणार आहे. मी ७४ वर्ष पूर्ण केली असून स्वतःला भाग्यवान समजतो. आयुष्यात माणुसकी मिळवली आणि आज मान्यवरांकडून मिळालेले कौतुक ही माझी मोठी संपत्ती आहे. माझ्या मुलांनीही या मार्गावर चालावे अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमातून मला प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाच्या शेवटी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा